बिहारमध्ये अधिकाऱ्यांनी लाटला महादलितांचा निधी

file photo
file photo

"सृजन'नंतर आणखी एक गैरव्यवहार उघड; तीन "आयएएस' अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

पाटणा: बिहारमधील हजारो कोटी रुपयांच्या "सृजन' गैरव्यवहाराच्या सुरस कथा रोज बाहेर येत असताना आता महादलित विकास योजनेअन्वये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमातही मोठी अफरातफर झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तीन आयएएस अधिकाऱ्यांसह अन्य दहा अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविली आहे.

"महादलित विकास मिशन' अन्वये प्रशिक्षणाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी पैसे लाटल्याचे उघड झाले आहे. या गैरव्यवहाराबाबतची तक्रार 2016 मध्येच अंमलबजावणी संचालनालयाकडे आली होती. या गैरव्यवहाराचा खरा सूत्रधार हा आयएएस अधिकारी एस.एम. राजू हा असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. महादलित विकास मिशनची सूत्रे पूर्वीपासून राजू यांच्याकडे होती. पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर राजू फरार झाले आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेत राजू यांना निलंबित केले असून, त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावल्याचे समजते. पुढील चौकशीसाठी आपण उपस्थित राहिला नाहीत, तर आम्ही एकतर्फी निर्णय देऊ, असेही सामान्य प्रशासन विभागाने त्यांना ठणकावले आहे. रवी मनूभाई आणि के. पी. रामेय्या यांनाही या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आले आहे.

रामेय्यांचे राजकीय कनेक्‍शन
रामेय्या यांचे राजकीय पक्षांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाले असून, मागील लोकसभा निवडणूक त्यांनी संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर लढविली होती. निवडणूक लढविण्यापूर्वी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती. सद्यःस्थितीमध्ये त्यांच्याकडे "बिहार भूमी न्याय प्राधिकरणा'चे सदस्यत्व आहे. बिहारमधील महादलित विकास मिशन अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये गैरव्यवहार होत असल्याचे मागील वर्षीच स्पष्ट झाले होते, पण संबंधित यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

परस्पर निधी खर्च केला
दहा सरकारी आणि खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांविरोधात देखील तक्रार नोंदविण्यात आली आहे, यामध्ये दोन विद्यमान आणि दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली सव्वाचार कोटी रुपयांचा निधी लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. महादलित विकास मिशनअन्वये अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे ठरले होते. या अधिकाऱ्यांनी परस्पर विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करून त्यांचा निधी उचलला आणि तो खर्चही केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com