दलित व्यक्तीस थुंकी चाटण्याची शिक्षा 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

महेश ठाकूर असे पीडित दलित व्यक्तीचे नाव आहे. अजयपूरचे सरपंच सुरेंद्र यादव यांच्या घरी त्यांनी बुधवारी प्रवेश केला तेव्हा यादव यांच्या घरी सर्व महिलाच होत्या. घरी कुणीही पुरुष नाही याची आपल्याला जाणीव नव्हती, असे ठाकूर यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे संतापलेले यादव यांनी गुरुवारी पंचायतची बैठक बोलावून ठाकूर यांना महिलांनी चपलेने बदडण्याची शिक्षा निश्‍चित केली.

पाटणा : कुणीही पुरुष नसताना सरपंचाच्या घरात प्रवेश केल्याबद्दल एका 54 वर्षीय दलित व्यक्तीस महिलांनी चपलांनी बदडून स्वतःची थुंकी चाटायला लावण्याचा घृणास्पद प्रकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या बिहारशरीफ या गृहजिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरपंचांसह आठ जणांवर एफआयआर दाखल केला आहे. 

महेश ठाकूर असे पीडित दलित व्यक्तीचे नाव आहे. अजयपूरचे सरपंच सुरेंद्र यादव यांच्या घरी त्यांनी बुधवारी प्रवेश केला तेव्हा यादव यांच्या घरी सर्व महिलाच होत्या. घरी कुणीही पुरुष नाही याची आपल्याला जाणीव नव्हती, असे ठाकूर यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे संतापलेले यादव यांनी गुरुवारी पंचायतची बैठक बोलावून ठाकूर यांना महिलांनी चपलेने बदडण्याची शिक्षा निश्‍चित केली. ते कदाचित सरपंचांच्या घरी तंबाखू मागण्यासाठी गेले असतील, अशी शक्‍यता नालंदाचे जिल्हाधिकारी एस. एम. थ्यागराजन यांनी व्यक्त केली. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रस्ते बांधकाममंत्री नंदकिशोर यादव यांनी या घटनेची तीव्र शब्दांत निंदा केली असून, सुसंस्कृत समाजात अशा घटनांना मुळीच स्थान नसल्याचे म्हटले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. या घटनेची तसेच ठाकूर यांनी सुनावण्यात आलेल्या शिक्षेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाशी असा व्यवहार कसा करू शकतो, असा नेटिझन्सचा सवाल आहे. तर बिहारमध्ये अश्‍मयुग अवतरल्याची टिप्पणी ट्विटरवर होत आहे.

Web Title: bihar viral video man forced to lick spit