'आरजेडी'च्या फलकांवरून लालू गायब; बिहार निवडणुकीत रंगले ‘पोस्टर वॉर’

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 21 September 2020

‘आरजेडी’च्या फलकांवरून पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे नाव व छायाचित्र गायब झालेले आहे

पाटणा- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलातील (आरजेडी) ‘पोस्टर वॉर’ शहरातील चौकाचौकात रंगू लागले आहे. विशेष बाब म्हणजे ‘आरजेडी’च्या फलकांवरून पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे नाव व छायाचित्र गायब झालेले आहे.

दोन्ही पक्षांच्या जाहिरात फलकांवर एकमेकांवर आरोप केलेले दिसत आहे. ‘आरजेडी’च्या फलकांवरू अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे अस्तित्व पुसले आहे. आतापर्यंत पक्षाच्या फलकांवर लालू केंद्रस्थानी असत. मात्र लालू प्रसाद यांची सध्याची प्रतिमा लक्षात घेऊन निवडणुकीच्या वर्षांत त्यांच्याविना फलक लावण्याचा निर्णय घेतल्याने दिसत आहे. मात्र ‘लालू जी गरिबांच्या हृदयात आहेत. त्या स्थानावरून त्यांना हटविणे शक्य नाही,’’ अशी बाजू पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जगदानंद यांनी मांडली. लालू नसले तरी फलकावर त्यांचे पुत्र तेजस्वी यादव, पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या प्रतिमा असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनाबाबत एकच धोरण असू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे मत

‘आरजेडी’ने लालूंना दूर ठेवले

लालू प्रसाद यांचे छायाचित्र ‘आरजेडी’च्या फलकावर नसल्याने भाजपने खिल्ली उडविली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल म्हणाले की, लालू यादव यांचे छायाचित्र फलकांवर प्रसिद्ध करण्यास ‘आरजेडी’ टाळाटाळ करीत आहे. पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणी लालू तुरुंगात आहेत. अशा लालूंच्या छायाचित्रापासून त्यांचा पक्ष चार हात लांब राहू इच्छित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bilhar election lalu prasad yadav not on rjd poster