Bilkis Bano Case : न्या. बेला त्रिवेदी सुनावणीपासून दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bilkis bano case supreme court judge justice bela trivedi recuses hearing plea 11 convicts release

Bilkis Bano Case : न्या. बेला त्रिवेदी सुनावणीपासून दूर

नवी दिल्ली : गुजरात दंगलीतील सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणातील पीडित बिल्किस बानोने अकरा दोषींच्या मुक्ततेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीपासून न्या. बेला. एम. त्रिवेदी यांनी स्वतःला दूर ठेवले आहे. न्या. अजय रस्तोगी आणि न्या. बेला. एम. त्रिवेदी यांच्या पीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरू होताच रस्तोगी यांनी आज आपल्या भगिनी या खटल्याच्या सुनावणीत सहभागी होणार नसल्याचे नमूद केले. आम्ही दोघेही ज्या पीठाचे सदस्य नाहीत, अशा पीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी सादर करण्यात यावे, असे रस्तोगी यांनी स्पष्ट केले. दरम्यान त्रिवेदी यांनी स्वतःला या प्रकरणापासून नेमक्या कोणत्या कारणामुळे दूर केले याचे निश्चित कारण मात्र दिलेले नाही.

बिल्किस बानोने याच प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने १३ मे २०२२ रोजी दिलेल्या आदेशांचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करणारी वेगळी याचिकाही सादर केली आहे. सामूहिक अत्याचार आणि खूनप्रकरणातील दोषींना १५ ऑगस्ट रोजी मुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिल्किस बानोने याचिका सादर केली होती. राज्य सरकारने दोषींच्या मुक्ततेबाबत घेतलेला निर्णय हा पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात जाणारा असून यासाठी वेगळ्या कायद्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने म्हटले होते, असे बानो हिच्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.