भारतात कोट्यधीश वाढले; तीन वर्षांत संख्येत दोनतृतीयांशने वाढ

भारतात कोट्यधीश वाढले; तीन वर्षांत संख्येत दोनतृतीयांशने वाढ

नवी दिल्ली- मंदी आणि महागाईने सामान्यांना बेजार केले असले, तरी देशातील कोट्यधीश करदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी करदात्यांविषयीची माहिती जाहीर केली. यात 81 हजार 344 करदाते वर्षाकाठी एक कोटीहून अधिक कमाई करत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन वर्षांत कोट्यधीश करदात्यांची संख्या दोनतृतीयांशने वाढल्याचेही कर मंडळाने म्हटले आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या माहितीनुसार 88 हजार 649 करदात्यांनी 2014-15 या वर्षात एक कोटीहून अधिक उत्पन्न घोषित केले होते. त्यात कॉर्पोरेट्‌स, कंपन्या, एचयूएफ आणि इतर श्रेणीतील करदात्यांचा समावेश आहे. 2017-18 या वर्षात ही संख्या एक लाख 40 हजार 139 पर्यंत वाढली आहे. यामध्ये 60 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे "सीबीडीटी'ने म्हटले आहे. अशाच प्रकारे वैयक्‍तिक करदात्यांची संख्याही 68 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. 2014-15 या वर्षात देशात 48 हजार 416 जणांनी एक कोटीहून अधिक उत्पन्नाची नोंद केली होती. 2017-18 मध्ये वैयक्‍तिक कोट्यधीशांची संख्या 81 हजार 344 पर्यंत वाढली आहे. करचोरी रोखण्यासंदर्भातील विविध उपाययोजनांमुळे गेल्या चार वर्षांत विवरणपत्र (रिटर्न) सादर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. 2017-18 या वर्षात सहा कोटी 85 लाख करदात्यांनी आयटी रिटर्न भरले. 2013-14 या वर्षात तीन कोटी 79 लाख करदात्यांनी रिटर्न भरले होते.

करदात्यांची संख्या वाढली 
नोटाबंदी, जीएसटी आणि करचोरी रोखण्याच्या उपाययोजनांमुळे करदात्यांची नाकाबंदी झाली आहे. काळ्या पैशासंदर्भातील मोहिमेने तीन वर्षांत उच्च उत्पन्न गटातील करदात्यांची नोंद वाढल्याचे बोलले जात आहे. 

1 लाख 40 हजार 139 - एक कोटींहून अधिक कमाई असणारे करदाते 
(कॉर्पोरेट्‌स, कंपन्या, एचयूएफ) 

81 हजार 344 - वैयक्‍तिक करदाते 

करचोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाधारित प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली. थकीत कर भरण्यासंदर्भात आणि करदात्यांची संख्या वाढवण्यासाठी मंडळाकडून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यश आहे. 
- सुशील चंद्रा, अध्यक्ष, सीबीडीटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com