काश्मिरी युवकांनो आमच्याशी तुम्ही लढू शकत नाही: लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

काश्मीरमधील युवकांनी समजून घेतले पाहिजे, की भारतीय लष्कर वाईट नाही. सीरिया, पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती हाताळण्यासाठी रणगाडे, लढाऊ विमानांचा वापर केला जातो. पण, आपल्या लष्कराकडून कमीत कमी नुकसान कसे होईल हे पाहिले जाते. काश्मीरमधील युवक नाराज असल्याचे मान्य आहे. पण, लष्करी जवानांवर दगडफेक करणे आणि हल्ले करणे योग्य नाही.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराशी लढू शकत नाही, हे काश्मीरमधील युवकांना समजावण्याची गरज आहे. त्यांना कधीच स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असे वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले आहे.

काश्मीरमधील युवक मोठ्या प्रमाणात हिंसाचाराकडे वळत आहेत. दगडफेकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. नुकतेच दगडफेकीत एका चेन्नईतील पर्यटकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा युवकांकडून होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने रावत यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

रावत म्हणाले, ''मी काश्मिरी युवकांना सांगू इच्छितो, की तु्म्हाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही. तुम्हाला स्वातंत्र्य कधीच मिळू शकत नाही. स्वातंत्र्य मागणाऱ्या आणि वेगळे होण्याची मागणी करणाऱ्याविरोधात आम्ही कायम लढू. तुम्ही शस्त्रास्त्रे का हातात घेत आहात? लष्कराच्या  गोळीबारात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवरून काही फरक पडणार नाही. हे चालतच राहणार आहे. काश्मीरमधील युवक भारतीय लष्कराकडून लढू शकत नाहीत का? दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांच्या हाती काहीच राहणार नाही. तुमच्याविरोधात लढण्यात आम्हाला आनंद वाटत नाही. पण, तुम्ही लढाईच करायची आहे, तर आम्ही पूर्ण ताकतीने लढू. हातात बंदूक घेऊन स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही, त्यांची दिशाभूल केली जात आहे. काश्मीरमधील युवकांनी दहशतवाद्यांविरोधात मोहिमेत लष्कराला मदत केली पाहिजे.''

काश्मीरमधील युवकांनी समजून घेतले पाहिजे, की भारतीय लष्कर वाईट नाही. सीरिया, पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती हाताळण्यासाठी रणगाडे, लढाऊ विमानांचा वापर केला जातो. पण, आपल्या लष्कराकडून कमीत कमी नुकसान कसे होईल हे पाहिले जाते. काश्मीरमधील युवक नाराज असल्याचे मान्य आहे. पण, लष्करी जवानांवर दगडफेक करणे आणि हल्ले करणे योग्य नाही, असे रावत यांनी सांगितले. 

Web Title: Bipin Rawat tells Kashmiri youth azaadi will never happen you cant fight Army