esakal | बर्ड फ्लूचा धोका वाढला; देशात 7 राज्यांमध्ये प्रादुर्भाव
sakal

बोलून बातमी शोधा

bird flu

 कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला असताना देशात आता बर्ड फ्लूचा संसर्गही वाढत चालला आहे. देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू आढळल्याचं समोर आलं आहे. 

बर्ड फ्लूचा धोका वाढला; देशात 7 राज्यांमध्ये प्रादुर्भाव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला असताना देशात आता बर्ड फ्लूचा संसर्गही वाढत चालला आहे. देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू आढळल्याचं समोर आलं आहे. यामध्ये केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे अशी माहिती पशूसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांनी दिली. दिल्ली, महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्येही पक्षी मेल्याचे वृत्त आहे मात्र त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले असून रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत असंही त्यांनी सांगितलं. 

हरियाणातील पंचकुला इथल्या दोन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लक्षणे असलेले पक्षी आढळले. तसंच मध्य प्रदेशातील शिवपुरी, राजगढ, शाजपूर, आगर, विदिशा जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत पक्ष्यांत लक्षणं दिसून आली आहे. कानपूरमधील झूलॉजिकल पार्क, प्रतापगढ, दौसा या राजस्थानमधील जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. 

हे वाचा - धक्कादायक! भारतात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू

पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी नियमावली जारी केली आहे. माणसांना याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करावा असं म्हटलं आहे. जलाशय, पक्षी दुकाने, चिमणीघर, पोल्ट्री फार्मच्या जवळ देखरेख वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मृत पक्षांच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी असंही सांगितलं आहे. 

हे वाचा - भारतात कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात; तारीखही निश्चित

दिल्लीत वेगवेगळ्या भागातील चार पार्क सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचा धोका आणि पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे हा निर्णय घेतला गेला आहे. दक्षिण दिल्लीतील हौस खास पार्क, साउथ वेस्ट दिल्लीतील द्वारका सेक्टर 9 मधील पार्क, पूर्व दिल्लीतील संजय झील, वेस्ट दिल्लीतील हस्तसाल पार्क पूर्णपणे बंद केलं आहे. 

loading image