शर्यतीच्या बैलाचा वाढदिवस; बेळगावच्या शेतकरी कुटूंबांचा उपक्रम

मिलिंद देसाई
रविवार, 7 एप्रिल 2019

प्रत्येक बैलाला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे आम्ही सांभाळतो. 15 वर्षांपुर्वी गुढीपाडव्या दिवशी अंकली येथुन बैल विकत आणला होता. हा बैल घरात आल्यापासुन अनेक शर्यतीत  भाग घेऊन यश मिळविले. त्याच्या या यशाची आठवण राहावी म्हणुन वाढदिवस जोरात साजरा करण्यात येतो. 
- मारुती पाखरे,
शेतकरी

बेळगाव - वाढदिवस हा प्रत्येक व्यक्‍तीच्या आयुष्यातला महत्वाचा, उत्साहाचा दिवस. आपल्या आवडत्या व्यक्‍तीच्या वाढदिवसाची तर अनेकजण जय्यत तयारी करीत असतात. परंतु शेतात काबाडकष्ट करणाऱ्या बैलाचा वाढदिवस साजरा केल्याचे उदाहरण क्‍वचितच पहावयास मिळते. मात्र येथील कारभार गल्ली येथील पाखरे कुंटुब घरातील नाग्या या बैलाचा वाढदिवस साजरा करतात. आज त्याचा 15 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

15 व्या वाढदिवसानिमित्त पाखरे कुटुंबाने  पै पाहुण्यांना निमंत्रणे दिली होती. या आगळ्या वेगळ्या वाढदिवस कार्यक्रमाला पाटील गल्ली, कारभार गल्ली आणि वडगाव भागातील 500 हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. आपल्या घरातील लहान मुलाचा वाढदिवस असल्याप्रमाणे साजरा करण्यात आलेल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी व ग्रामस्थांसाठी जेवणाचेही आयोजन केले होते. 

वडगाव भागात शेतकऱ्यांची संख्या मोठ्‌या प्रमाणात आहे. आजही येथील शेतकरी बैलजोडी बाळगतात. यापैकी मारुती पाखरे यांच्या शेतकरी कुंटुंबाने शर्यतीसाठी बैलजोडी पाळली आहे. पंधरा वर्षांपुर्वी अंकली येथील एका शेतकऱ्याकडुन 1 लाख 52 हजार रुपयांना खरेदी केलेल्या नाग्या बैलामुळे पाखरे यांनी बेळगाव शहर आणि परिसरातील 200 हुन अधिक शर्यती जिंकल्या आहेत. त्यामुळेच वडगाव भागात नाग्या बैलाला हिंद केसरी म्हणुन ओळखले जाते.

गुढी पाडव्याला खरेदी केल्यामुळे गुढी पाडवा हाच नाग्या बैलाचा वाढदिवस आहे असे समजत अनेक वर्षांपासुन या दिवशी या बैलाला सजविले जाते. यंदा आकर्षक व्यासपीठ व फलक आदी लावून मोठ्या थाटात या बैलाचा वाढदिवस साजरा केला. तसेच बैलाला सजवुन औक्षण करुन आरती करण्यात आली. मारुती पाखरे, संजय पाखरे, मनोज इंजल, अमोल गेंजी यांच्यासह शेती सुधारणा युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. 

प्रत्येक बैलाला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे आम्ही सांभाळतो. 15 वर्षांपुर्वी गुढीपाडव्या दिवशी अंकली येथुन बैल विकत आणला होता. हा बैल घरात आल्यापासुन अनेक शर्यतीत  भाग घेऊन यश मिळविले. त्याच्या या यशाची आठवण राहावी म्हणुन वाढदिवस जोरात साजरा करण्यात येतो. 
- मारुती पाखरे,
शेतकरी

Web Title: Birthday celebration of Bull in Belgaum farmers family