लग्नपत्रिकेत दिसणार वधू-वरांची जन्मतारीख 

पीटीआय
मंगळवार, 23 एप्रिल 2019

लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावांसोबतच त्यांची जन्मतारीखही नमूद करण्यात येणार.

बुंदी (राजस्थान) (पीटीआय) : राजस्थानमध्ये आजही बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंपरा व रुढींचा पगडा अजूनही समाजावर असल्याचे यातून दिसते. मात्र या प्रभावातून बाहेर पडत बालविवाह रोखण्यासाठी बुंदी गावाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावांसोबतच त्यांची जन्मतारीखही नमूद करण्यात येणार. तसेच, बालविवाह हा शिक्षापात्र गुन्हा असल्याचा वैधानिक इशाराही देण्यात येणार आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (7 मे) राजस्थानमध्ये अनेक बालविवाह लपूनछपून होत असतात. म्हणून याच दिवशी बुंदीच्या या उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक, भूनोंदणी निरीक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि "साथी' यांचे पथक तयार केले आहे. बालविवाह रोखणे आणि अशा विवाहांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी या पथकाकडे असेल. बुंदीच्या जिल्हाधिकारी रुक्‍मिणी रियार यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जागरूक राहण्याचा आदेश दिला आहे.
 
संबंधित भागांतील घरांमध्ये काय चालले आहे, याकडे ही पथके नजर ठेवणार आहेत. घरांना रंग देणे, मुलांच्या हातावरील मेंदी, शाळेतील अनुपस्थिती, वाजंत्री, गुरुजी आणि वाहनांचे आरक्षण करणे आदी गोष्टींवर पथक लक्ष ठेवणार आहे. जर बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आले, तर पथकाने तहसीलदार आणि पोलिस स्थानकात तातडीने कळविणे आणि बालविवाह करण्यापासून पालक आणि कुटुंबातील सदस्यांना रोखणे हे त्यांचे काम असेल, अशी माहिती रियार यांनी दिली. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना 
- लग्नपत्रिकेसाठी जन्मदाखल्याची मागणी करणे 
- लग्नपत्रिकेत बालविवाहाबद्दल वैधानिक इशारा प्रसिद्ध करणे 
- मांडव व विद्युत रोषणाई व्यावसायिकांनाही असा इशारा देणे अनिवार्य 
- या आदेशाचे पालन न केल्यास शिक्षा 
- अक्षय्य तृतीयेपूर्वी नियंत्रण कक्ष उभारणे 
- बालविवाहांची नोंद करणे 
- शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंधक जागरूकता कार्यक्रम राबविणे 

Web Title: Birthday date of bride and groom to show in wedding Card