बिस्मिल्ला खॉं यांच्या चांदीच्या शहनाईंची चोरी

पीटीआय
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

वाराणसी - दिवंगत शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या शहनाई त्यांचा मुलगा काझिम हुसेन यांच्या घरातून चोरीस गेल्या आहेत. यातील चार शहनाई चांदीच्या आहेत. याविषयी पोलिसांकडे रविवारी सायंकाळी फिर्याद दाखल करण्यात आली असल्याची माहिती बिस्मिल्ला खॉं यांचे नातू राझी हसन यांनी सोमवारी दिली.

वाराणसी - दिवंगत शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या शहनाई त्यांचा मुलगा काझिम हुसेन यांच्या घरातून चोरीस गेल्या आहेत. यातील चार शहनाई चांदीच्या आहेत. याविषयी पोलिसांकडे रविवारी सायंकाळी फिर्याद दाखल करण्यात आली असल्याची माहिती बिस्मिल्ला खॉं यांचे नातू राझी हसन यांनी सोमवारी दिली.

ते म्हणाले, 'दालमंडी येथील नवीन घरात आम्ही नुकतेच स्थलांतर केले आहे. सराई हर्ष येथील आमच्या वडिलोपार्जित घराला भेट देऊन आम्ही नव्या घरी आलो तेव्हा दार उघडे दिसले. घरातील ट्रंकचे कुलूप कोणीतरी तोडलेले होते. त्यातून पाच शहनाई चोरीला गेल्याचे आढळले. चार शहनाई चांदीच्या तर एक लाकूड व चांदीने तयार केलेली होती. तसेच इनायत खॉं पुरस्कार व सोन्याच्या दोन बांगड्या चोरांनी पळविल्या आहेत.'' वरिष्ठ पोलिस अधीक्षक नितीन तिवारी यांनी चोरी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

'या शहनाई उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्यासाठी खास होत्या. त्या चोरीला गेल्याने कुटुंबाला दुःख झाले आहे. दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, कपिल सिब्बल आणि लालूप्रसाद यादव यांनी त्या त्यांना भेट दिलेल्या होत्या. यातील एका शहनाईने ते दर वर्षी मोहरमच्या मिरवणुकीत वादन करीत असल्याने ती त्यांच्यासाठी मौल्यवान होती. आता एका लाकडी शहनाईशिवाय एकही शहनाई आमच्याकडे उरलेली नाही. लाकडी शहनाईवर बिस्मिल्ला खॉं रियाज करीत असत,'' असे हसन यांनी सांगितले.

संग्रहालयाची प्रतीक्षाच
उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांचे निधन 2006 मध्ये झाले. त्यांच्या कलेच्या सन्मान म्हणून मिळालेल्या स्मृतिचिन्हांचे जतन करण्यासाठी संग्रहालय उभारण्याची मागणी त्यांचे कुटंबीय गेल्या दहा वर्षांपासून करीत आहेत. याबाबत बोलताना राझी हसन म्हणाले, की बिस्मिल्ला खॉं यांच्या स्मरणार्थ संग्रहालय निर्माण केल्यास तेथे त्यांच्या वस्तू ठेवता येतील, असे आम्हाला वाटत होते. पण त्या अशा पद्धतीने चोरीला जातील, हे कोणाला माहीत होते. आता आमच्याकडे उस्तादांना मिळालेले भारतरत्न सन्मानचिन्ह, पद्मश्री सन्मान व अन्य काही पदके आहेत.

Web Title: bismillah khan theft of silver shahnai