केजरीवाल यांच्या घरासमोर भाजपची निदर्शने

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

गेल्या दोन दिवसांपासून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागत आहोत, मात्र त्यांची वेळ देण्यात येत नाही. त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दोन तास थांबून ठेवले आणि नंतर मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे सांगितले. आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहोत, मात्र मुख्यमंत्री मागच्या दाराने निघून गेले

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील पाण्याच्या समस्येविरुद्ध आज दक्षिण दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे खासदार परवेश साहेबसिंह वर्मा आणि आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या सिव्हिल लाइन येथे जाऊन या दोन्ही नेत्यांनी त्यांच्याशी चर्चेची मागणी केली. मात्र व्यस्त कार्यक्रमाचे कारण देत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर वर्मा आणि सिरसा यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लावलेले पोस्टर फाडले आणि त्यांच्या कामाच्या दिवसाच्या सुटीचा निषेध केला. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागत आहोत, मात्र त्यांची वेळ देण्यात येत नाही. त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दोन तास थांबून ठेवले आणि नंतर मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे सांगितले. आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहोत, मात्र मुख्यमंत्री मागच्या दाराने निघून गेले, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल हे साउथ ऍव्हेन्यूमध्ये गेले होते तेथे आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेथे पोलिसांनी बॅरिकेट्‌स लावून ठेवली होती. मुख्यमंत्री केजरीवाल हे जनतेच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सिरसा यांनी केला.

Web Title: BJP agitates against Kejriwal