काँग्रेसला चर्चा नको तर गदारोळ हवा : अमित शहा

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तर अमित शहा यांनी कर्नाटकातील हुबळी तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मोदींच्या वाराणसी या मतदारसंघात उपोषण केले. तसेच भाजपकडून देशभर हे आंदोलन करण्यात आले असून, देशातील सर्व खासदारांनी त्यांच्या विभागात एक दिवसाचे उपोषण केले.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशादरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज झालेच नाही. काँग्रेसने विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले. त्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक खासदारांनी एक दिवसीय उपोषण केले. या उपोषणादरम्यान अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला चर्चा नको तर गदारोळ हवा, असे शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तर अमित शहा यांनी कर्नाटकातील हुबळी तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मोदींच्या वाराणसी या मतदारसंघात उपोषण केले. तसेच भाजपकडून देशभर हे आंदोलन करण्यात आले असून, देशातील सर्व खासदारांनी त्यांच्या विभागात एक दिवसाचे उपोषण केले. यादरम्यान अमित शहा म्हणाले, काँग्रेसला सभागृहात कोणतीही चर्चा नको. तर काँग्रेसला वाद हवा आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील खासदार आणि आमदारांसह उपोषण ठिकाणी उपस्थिती लावली. पूनम महाजन, प्रकाश रावल, आमदार पराग अलावनी, अमित साटम, आशिष शेलार यांनीदेखील या उपोषणावेळी मुंबईत उपस्थिती लावली. ''मोदींना कोणताही पर्याय नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

संसदेचे 23 दिवसांचे कामकाजच न झाल्याने भाजपच्या सर्व खासदारांनी त्या काळातील वेतन न घेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 79, 752 रूपये वेतन घेणार नाहीत अशी माहिती मिळत आहे.  

दरम्यान, या उपोषणादरम्यान पंतप्रधानांनी 'ब्रेक फास्ट' आणि 'लंच' केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी केला. सूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या उपोषण कार्यक्रमाचे पत्रक जारी करत पंतप्रधानांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.

Web Title: BJP Amit Shah Criticizes Congress One Day Fast