बिहारमध्ये 'दिल-दोस्ती दोबारा'; नितीशकुमारांना भाजपचा पाठिंबा 

उज्ज्वलकुमार
गुरुवार, 27 जुलै 2017

भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राजभवनाला तसे पत्र पाठविण्यात आले. संयुक्त जनता दलालाही याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. नितीशकुमार यांनी मध्यरात्री राज्यपालांची भेट घेऊन भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला.

पाटणा : बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या "अंतरात्म्याचा आवाज' ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावरील नवे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज (गुरुवार) सकाळी नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राजभवनाला तसे पत्र पाठविण्यात आले. संयुक्त जनता दलालाही याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. नितीशकुमार यांनी मध्यरात्री राज्यपालांची भेट घेऊन भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला.

लालूप्रसादांची साथ नितीशकुमार यांनी सोडल्यावर पुढच्या तीन तासांत बिहारमध्ये वेगवान घडामोडी घडल्या. नरेंद्र मोदी यांना भाजपने 2013 मध्ये पंतप्रधानपदासाठीची उमेदवारी दिल्यावर नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली होती. तीन वर्षांनी घटनाक्रम बरोबर उलट फिरला आहे. भाजप या सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी जाहीर केले. या वेगवान घडामोडींमुळे भ्रष्टाचारमुक्तीच्या मुद्द्यावर मोदी-नितीशकुमार एकत्र येणार हे निश्‍चित झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या होणार असून, त्यात विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. 

तत्पूर्वी, नितीशकुमार यांनी आज सायंकाळी आपल्या निवासस्थानी आमदारांची बैठक घेतल्यानंतर तातडीने राजभवन गाठले, येथे पंधरा मिनिटे राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. या राजकीय गोंधळात भारतीय जनता पक्षाने मात्र मुदतपूर्व निवडणुकीस आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. दुसरीकडे दिल्लीत भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक राज्यसभेचे उमेदवार निवडण्याची बैठक होती. ती बैठक सुरू असतानाच राजीनाम्याची बातमी धडकली. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमीत शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली व राजकारणाची नवी दिशा स्पष्ट झाली. 

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांनीही यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेऊन नितीशकुमार यांच्यावर आरोप केले. संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाने एकत्र येत नवा नेता निवडावा, यामुळे नितीशही राहणार नाहीत आणि तेजस्वीही दिसणार नाहीत. आम्हाला राज्यात राष्ट्रपती राजवट नको आहे, असे त्यांनी नमूद केले. 

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री आणि लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला होता. संयुक्त जनता दलाने वेळोवेळी इशारा दिल्यानंतर देखील लालूप्रसाद यादव यांनी तो गांभीर्याने घेतला नाही त्यामुळे आजअखेरीस नितीश यांनी राजीनामा देत लालूंना धोबीपछाड दिला. राजभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना नितीश म्हणाले, की आम्ही कोणाचाही राजीनामा मागितला नव्हता अथवा आघाडी धर्माला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य आमच्या हातून घडले नव्हते. परिस्थितीच अशी झाली होती की माझ्यासारख्या व्यक्तीला काम करणे अवघड झाले होते. लोकांमध्ये केवळ एकाच गोष्टीची चर्चा सुरू होती, खूप विचार केल्यानंतर आणि अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 

पक्षीय बलाबल 
243.... एकूण सदस्य 
122... बहुमतासाठी आवश्‍यक 
80... राष्ट्रीय जनता दल 
71... संयुक्त जनता दल 
53... भाजप 
27... कॉंग्रेस 
12 - अन्य 

भ्रष्टाचाराविरोधातील लढाईमध्ये सहभागी झाल्याबद्दल नितीशकुमार यांचे खूप खूप अभिनंदन, देशातील सव्वाशे कोटी जनता आपल्या प्रामाणिकपणाचे समर्थन करत त्याला पाठिंबा देत आहे. देशासाठी विशेषत: बिहारच्या राजकीय भवितव्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून लढणे आवश्‍यक आहे. हीच देश आणि काळाची मागणी आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

राजीनामा देण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांच्याशीही चर्चा केली आहे. दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही याच मुद्‌द्‌यावर संवाद साधला होता. राज्यात सरकार चालविणे अवघड होऊन बसल्याचे तेव्हाच मी राहुल गांधी यांना सांगितले होते. कोठूनच काही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. लोकांना दिलेली आश्‍वासने माझे सरकार पूर्ण करत होते. हा राजकीय विरोधाभास कधी दूर होईल, याबाबत मी आताच काही बोलू शकत नाही. 
- नितीशकुमार 

नितीशकुमार यांच्याविरोधात हत्येचा खटला सुरू असून, या प्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते. खुद्द नितीश यांनी ही बाब मान्य केली आहे. या प्रकरणातून ते वाचले नसते, हे राजीनामानाट्य त्याचाच एक भाग आहे. नितीश यांचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सेटिंग असून, त्यांच्या निर्णयामुळे जातीयवादी शक्तींना बळ मिळेल. 
- लालूप्रसाद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा 

आम्हाला मुदतपूर्व निवडणूक नको आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- सुशीलकुमार मोदी, भाजपचे नेते. 

Web Title: BJP and JD(U) join hands in Bihar, Nitish Kumar swearing-in