गोव्यात भाजप बिनचेहऱ्याने लढणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार बनण्यास स्पष्ट नकार दिल्याने भाजपला गोव्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याव्यतिरिक्तच मतदारांना समोरे जावे लागणार, अशी चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार बनण्यास स्पष्ट नकार दिल्याने भाजपला गोव्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याव्यतिरिक्तच मतदारांना समोरे जावे लागणार, अशी चिन्हे आहेत.

गोव्याचे निवडणूक प्रभारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, "गोव्याचे भावी मुख्यमंत्री नवनिर्वाचित आमदारच ठरवतील. मग तो चेहरा दिल्लीतीलही असू शकतो,' असे विधान आज केले. त्यातून काल केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीतील विविध घटनांचे धारदोरे जुळत आहेत. भाजपने आज गोव्याची अर्धी यादी जाहीर केली. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या उमेदावाराबद्दल भाजप काहीही बोलण्यास तयार नाही. ही यादी जाहीर करणारे जे. पी. नड्डा यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी तो विषय संसदीय मंडळ हाताळेल अशी सारवासारव केली. वर्तमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यापेक्षाही गोव्यात पर्रीकर हाच भाजपचा मुख्य चेहरा असल्याचे उघड आहे.

गोव्यात सुभाष वेलिंगकर यांच्या पुढाकाराने जन्माला आलेली महाआघाडी, कॉंग्रेस व "आप' यांचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. जेमतेम 40 जागांच्या विधानसभेत दोन-तीन जागाही सारा खेळ घडवू-बिघडवू शकतात. या वादळातून भाजपची नौका पार करण्याची क्षमता गोव्यात आज तरी पर्रीकरांमध्ये असल्याचे मानले जाते. दर आठवड्याला पणजीतील परिवहन भवनात तळ ठोकणाऱ्या पर्रीकरांच्याच शब्दाला गोव्यात आजही पार्सेकारंपेक्षा मान असल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कालच्या बैठकीत गोव्यात चेहरा कोण, असा सवाल आला तेव्हा पर्रीकरांच्याच नावाची शिफारस पुढे आली. त्यानंतर त्यांना याबाबत विचारणा करणयात आली. पहिल्या प्रयत्नाला थंड प्रतिसाद मिळाल्यावर भाजप अध्यक्षांसह अन्य दोन नेत्यांनी पर्रीकरांशी फोनवरून चर्चा केली. मात्र पर्रीकरांनी "गोव्यात भाजपची प्रचारधुरा आपण सांभाळू,' असा शब्द देताना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनण्यास मात्र ठाम नकार दिल्याचे कळते. वेलिंगकर, शिवसेना व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या महाआघाडीने सुदीन ढवळीकर यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे. कॉंग्रेसकडे दिगंबर कामत आहेतच. मात्र सत्तारूढ भाजपकडे चेहराच नाही व जो चेहरा आहे त्या पर्रीकरांना हट्टाने दिल्लीत आणून बसविले, अशी भाजपची विचित्र अवस्था झाली आहे. त्यामुळेच पक्षाने गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा निर्णय स्थानिक आमदारांवर सोडला आहे.

चित्त तिचे पिलापाशी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकरांना दिल्लीत आणले त्या दिवसापासूनच ते दिल्लीत राहण्यास अनुत्सुक असल्याचे वारंवार दिसले आहे. यापूर्वी "सकाळ'शी खास बातचीत करतानाही पर्रीकरांनी "घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी,' या म्हणीद्वारे आपले गोवाप्रेम अधोरेखित केले होते. पार्सेकरांना आमदारांचे पाठबळ नसल्याने भाजपची सत्ता आली, तर पर्रीकर यांना गोव्यात पाठविण्याशिवाय पक्षनेतृत्वासमोर दुसरा पर्याय नसेल, असे वातावरण तयार होण्याचे हेही एक कारण आहे.

Web Title: bjp avoids to declare chief ministerial candidate