गोव्यात भाजपकडून जनमत कानोसा

BJP
BJP

पणजी : लोकसभा निवडणूक जाहीरनामा तयार करण्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने जनमानसाचा कानोसा घेणे सुरु केले आहे. यासाठी खास तयार केलेले रथ गावागावात जाणार असून सत्तरीतून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरु करण्यात आले आहे.

लोकांनी सुचवलेले मुद्दे जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे वरकरणी सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात जनतेत सरकारविषयी असंतोष आहे का याची चाचपणी करण्यात येत असल्याचे दिसते. जाहीरनाम्यात कोणते मुद्दे हवे याची माहिती घेऊन लोकांची नाराजी कोणत्या एका विशिष्ट्य मुद्याविषयी आहे का हेही जाणून घेतले जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून ही मोहिम राबवण्यात येत असली तरी यातून प्रतिबिंबिंत होणारी जनमते ही सरकारची छबी सुधारण्यासाठी वापरली जाणार आहेत हे नक्की.

राष्ट्रीय जाहीरनामा तयार करताना गोव्यातून पर्यटनाविषयी काय मते आहेत हे जाणून घ्यायचे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनज सहस्त्रबुद्धे आज गोव्यात आले आहेत. त्यांनी आज दुपारी पर्यटन व्यवसायाशी संबंधितांशी सखोल चर्चा करून पर्यटन क्षेत्राची सद्यस्थिती, आव्हाने आणि पुढे करावयाच्या उपाययोजना, सरकारी पातळीवर झालेल्या चुका याविषयी माहिती घेतली. सहस्त्रबुद्धे हे गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील भाजपच्या जाहिरनामा समितीचे सदस्य आणि विदेश व्यवहार उपसमितीचे निमंत्रक असले तरी त्यांच्याकडे गोव्यातील जनतेची मते जाणूुन घेण्याची जबाबदारी विशेषकरून देण्यात आली आहे.

सहस्त्रबुद्धे यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले, की केंद्र सरकारने केलेल्या कामाचा हिशेब देत जनतेच्या नव्या येणाऱ्या सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आ हे. त्यासाठी छापील स्वरूपाचा एक कागद मतदारांना दिला जातो. त्याच्या मागे मतदाराने आपल्या अपेक्षा लिहून यासाठी देशभरात फिरणाऱ्या रथांत ठेवलेल्या पेटीत तो कागद टाकावा. त्या कागदावरील विषय़ांचे संकलन करून जास्तीत जास्त लोकांनी सुचवलेला विषय़ जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. देशभरात असे 180 रथ करण्यात आले आहेत.

या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, दक्षिण गोव्याचे खासदार अॅड नरेंद्र सावईकर, प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते. यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या दोन चित्रफीती दाखवण्यात आल्या.

सत्तरी तालुक्यातून जनमत जाणून घेणाऱ्या रथाने प्रवास केला आहे. प्रत्येक मतदार केेंद्रावर हा रथ जाणार असूुन त्यात असलेले कार्यकर्ते लोकांशी संवाद साधणार आहेत. लोकांचे म्हणणे संकलीत करणार आहेत. त्यातून जनमानसाचा कौल काय आहे याचा अंदाज पक्षाला येणार आहे.
- खासदार विनय तेंडुलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष

मार्च अखेरपर्यंत भाजपचा जाहीरनामा तयार होईल. त्याआधी लोकांच्या आशा, आकांक्षा, अभिमत जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा प्रयोग केला होता.
- खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com