तिसऱ्या वर्धापनानिमित्त 'मोदी महोत्सवां'चा बार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 मे 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त भाजपने आता मोदींच्याच नावाचा उत्सव करण्याचा घाट घातला आहे. 'मोदी' या इंग्रजी नावातील प्रत्येक अक्षराचा विस्तार करून 'मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया' म्हणजेच 'मोदी' हा जंगी उत्सव देशभरात साजरा केला जाईल.

याला जोडूनच या निमित्ताने 'न्यू इंडिया' म्हणजेच नवा भारत या संकल्पनेभोवती गोवलेल्या महिनाभराच्या कार्यक्रमांचा देशातील 900 शहरांत प्रयोग होणार आहे. प्रत्येकी किमान चार लोकसभा मतदारसंघांतील मोदी महोत्सवांना हजर राहणे भाजपच्या प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना बंधनकारक राहणार आहे. 

एखाद्या शब्दाचा विस्तार करून महापुरुषांच्या आठवणींचा किंवा चमकदार नावांचा जागर करण्याचा प्रघात मोदी सरकारच्या काळात पडला आहे. 'निती', 'समाधान', 'अटल', 'भीम'पाठोपाठ आता खुद्द मोदींच्याच नावाचा विस्तार केला गेला आहे. 

तिसऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीचा मंत्रालयस्तरीय आढावा घेण्याची जबाबदारी वेंकय्या नायडू यांच्यावर देण्यात आली आहे. ते प्रत्येक मंत्र्यांशी बोलून, तुम्ही केलेल्या घोषणा नव्हे तर प्रत्यक्षात आलेल्या योजनाच सादरीकरणात प्राधान्याने घ्या, असे बजावत असल्याचे माहिती आहे. प्रत्येक मंत्रालयाने यानिमित्त एकेक चकचकीत पुस्तिका प्रकाशित करायची आहे.

सरकारी दूरदर्शन, आकाशवाणी, लोकसभा-राज्यसभा वाहिन्या यांच्यावरील मंत्र्यांच्या स्वतंत्र मुलाखती सुरू झाल्या आहेत. 26 मेपासून सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचा जंगी महोत्सव देशात सुरू होईल. नोटाबंदीनंतर आलेल्या आर्थिक मरगळीचा किंवा पैशांच्या चणचणीचा मुद्दा या कामी भेडसावणार नाही, असे सांगितले जाते.

खुद्द मोदी तृतीय वर्षपूर्ती कार्यक्रमांचे उद्‌घाटन आसाममधील गुवाहाटीतून करतील असे सांगितले जाते. यापूर्वी ते यासाठी लखनौत जाणार असे वातावरण होते. यानंतर 27 व 28 मेपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध मंत्री पत्रकार परिषदा घेऊन मोदी सरकारच्या यशाची माहिती देतील. यानिमित्त खुद्द मोदींनी लिहिलेली 'आभारपत्रे' देशातील किमान एक कोटी सामान्य नागरिकांना पाठविण्याचीही योजना आखण्यात आली आहे. या मंडळींची निवड प्रामुख्याने 'मन की बात'साठी आलेल्या सूचनांच्या आधारावर केली जाईल. त्यापेक्षा जास्त लोकांना सरकारच्या यशस्वी योजनांची माहिती देणारे 'एसएमएस' पाठविले जातील. 

मेरा देश बदल गया है... 
महोत्सवाच्या नावापासूनच होणारा संभाव्य विरोध पाहता याचे आयोजन मुख्यतः भाजप करणार आहे. भाजपशासित राज्यांत व मुख्य शहरांतच तो राबविण्याचे नियोजन आहे. त्याच्या यशाची जबाबदारी भाजपचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांवर व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टाकली जाईल. याशिवाय 500 शहरांत 'सबका साथ सबका विकास' नावाचे महोत्सव भरविले जातील. 'मेरा देश बदल रहा है,' या मागील वर्षीच्या टॅगलाइनमध्ये किंचित बदल करून यंदा, 'मेरा देश बदल गया है' असे सांगणाऱ्या जाहिरात गीतांचे ध्वनिमुद्रण नुकतेच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: BJP to celebrate 'Modi Utsav' all over India