भाजपची आजपासून विस्तार यात्रा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

बूथनिहाय प्रचार 
आपल्या आगामी 15 दिवसांच्या दौऱ्यात अमित शहा पश्‍चिम बंगाल, तेलंगण, लक्षद्वीप, गुजरात व ओडिशा येथे प्रत्येकी तीन दिवस राहून दीनदयाळ विस्तार योजनेचा विस्तार करतील. या योजनेत पक्षकार्यकर्ते पुढचे 15 दिवस प्रत्येक बूथनिहाय घरोघरी जाऊन, तसेच ग्रामपंचायतींच्या पातळीवर मेळावे घेऊन समाजाच्या सर्व वर्गांत भाजपचा प्रचार करतील. हे कार्यकर्ते स्थानिकांना मोदी सरकारच्या योजनांची माहिती सांगणाऱ्या सचित्र पुस्तकांचा संचही भेट देतील.

नवी दिल्ली - छत्तीसगडमधील आजच्या नक्षलवादी हल्ल्याचा घाव ताजा असतानाच भाजप अध्यक्ष अमित शहा हे उद्या (ता. 25) नक्षलवादी चळवळीचा आरंभबिंदू असलेल्या पश्‍चिम बंगालमधील नक्षलबाडी या गावातूनच आपली त्रैमासिक "भाजप विस्तार यात्रा' सुरू करणार आहेत. "गरीब कल्याण' व "सबका साथ, सबका विकास' या घोषणेद्वारे नक्षलवादी भागात, तर तोंडी तलाक प्रथा बंद करण्याचा नारा देऊन मुस्लिम बहुल महिला भागांत आक्रमक धडक देणे अशी भाजपने रणनीती आखली आहे.

प्रामुख्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आंध्र, कर्नाटक, तेलंगण, त्रिपुरा व केरळ या राज्यांत भाजपची आक्रमकता जास्त राहणार आहे. कदाचित 2019 मध्ये मध्य व उत्तर भारतातून बहुमतासाठी जागा कमी पडल्या, तर तो खड्डा या राज्यांतून भरून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 

भाजपने आपल्या विस्तार कार्यक्रमाला आक्रमकतेने पुढे नेण्याची दीनदयाळ विस्तार योजना आखली असून, शहा यांच्या बूथ विस्तार कार्यक्रमाची व्याप्ती आता वरील राज्यांत वाढविण्याचे पक्षाने ठरविले आहे. यासाठी संघाच्या धर्तीवर विस्तारक योजना आखण्यात आली आहे. याअंतर्गत 3 लाख 68 हजार कार्यकर्ते 15 दिवासांसाठी, चार हजार जण सहा महिने ते एका वर्षासाठी देशाच्या विविध भागांत जाऊन वास्तव्य करतील व पक्षसंघटनेचे काम वाढवतील. या योजनेचाही प्रारंभ शहा हे उद्या नक्षलबाडीतील कार्यक्रमात करतील. 

पश्‍चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्ह्यातील नक्षलबाडी हे अजूनही नक्षलवादी चळवळीचा गड मानले जाते. भाजपने त्याच ठिकाणापासून यात्रा सुरू करण्याचे जाहीर करून डाव्या पक्षांनाही एक संदेश दिला आहे. छत्तीसगडमधील आजच्या हल्ल्याचे वृत्त आल्यावरही शहा यांनी आपला उद्याचा कार्यक्रम बदललेला नाही. उद्या ते येथील स्वच्छता कार्यक्रमात सहभाग घेतील. तसेच गरीब कल्याण, सबका साथ, सबका विकास या मोदी सरकारच्या घोषणांची माहिती स्थानिकांना देतील. 

बूथनिहाय प्रचार 
आपल्या आगामी 15 दिवसांच्या दौऱ्यात अमित शहा पश्‍चिम बंगाल, तेलंगण, लक्षद्वीप, गुजरात व ओडिशा येथे प्रत्येकी तीन दिवस राहून दीनदयाळ विस्तार योजनेचा विस्तार करतील. या योजनेत पक्षकार्यकर्ते पुढचे 15 दिवस प्रत्येक बूथनिहाय घरोघरी जाऊन, तसेच ग्रामपंचायतींच्या पातळीवर मेळावे घेऊन समाजाच्या सर्व वर्गांत भाजपचा प्रचार करतील. हे कार्यकर्ते स्थानिकांना मोदी सरकारच्या योजनांची माहिती सांगणाऱ्या सचित्र पुस्तकांचा संचही भेट देतील.

Web Title: BJP chief Amit Shah to start 15-day nationwide ‘Vistaar Yatra’