राममंदिर उभारणारच ही काळ्या दगडावरील रेघ : अमित शहा

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या आगामी लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या सर्वांत मोठ्या देशव्यापी अधिवेशनाचे उद्‌घाटन करताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम, पेशवे हा सारा मराठ्यांचा इतिहास आठवला. शिवरायांनी निर्माण केलेले व पेशव्यांनी अटकेपार हिंदवी साम्राज्य वाढविले. पण एक पानिपतची लढाई मराठे हरले आणि हा देश दोनशे वर्षे मागे गेला, तशीच 2019 च्या निवडणुकीचे निकाल देशाच्या इतिहासावर शतकानुशतके परिणाम करणारे असतील, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. आगामी निवडणूक ही "वैचारिक लढाई' आहे असे सांगतानाच "राममंदिर उभारणारच' अशीही गर्जना शहांनी केली. 

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनास रामलीला मैदानावर आज प्रारंभ झाला. आणीबाणीनंतरचे ऐतिहासिक सत्तांतर व भाजपच्याही 2014 च्या विजयास रामलीला मैदानावरील अधिवेशने कारणीभूत ठरल्याचे सांगून शहा म्हणाले, ""मराठे पानिपतची लढाई हरले आणि सारा भारत देश 200 वर्षे मागे गेला. आगामी निवडणुकीबाबत तशीच परिस्थिती आल्याने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचे 35 पक्ष एकजुटीने सज्ज झाले आहेत व भाजप कार्यकर्त्यांनी यात सर्वस्व वाहण्याची तयारी ठेवावी. नेताही नाही व नियतही नाही अशी विरोधकांची महाआघाडी म्हणजे थोतांड आहे. हे सारे स्वार्थी लोक फक्त सत्तेसाठी विकासाच्या विरोधात एकत्र आले आहेत. एकीकडे ही स्वार्थी आघाडी व दुसरीकडे गरीब कल्याण व सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढे नेणारे भाजप सरकार यातील वैचारिक लढाई म्हणजे आगामी निवडणूक असेल.'' 

गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने 50 ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगताना गंगा स्वच्छता, स्वच्छ भारत, जन धन, शौचालये बांधणे, बेटी बचाव बेटी पढाओ, शेतकरी योजना आदी योजनांचा उल्लेख शहा यांनी केला. ते म्हणाले, ""आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप उत्तर प्रदेशात 73 ते 74 जागा मिळवेल असा विश्‍वास आहे. तेथील आत्या-भाचा यांची आघाडी संधिसाधू आहे. करतारपूर कॅरिडोर आम्हीच भाविकांसाठी खुला करून दिला. आसाममध्ये राष्ट्रीय नोंदवहीची अंमलबजावणी करताच कॉंग्रेस, सप- बसपा यांना घुसखोरांचा कळवळा आला व त्यांनी राज्यसभेत आरडाओरडा केला. पण मोदी सरकार देशातील प्रत्येक घुसखोराला वेचून वेचून बाहेर हाकलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.'' सवर्णांना 10 टक्के आरक्षणाच्या कायद्यावरही त्यांनी जोरदार भाष्य केले. 

राफेल गैरव्यवहारावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्ला व त्यामुळे होणारी वाढती वातावरणनिर्मिती यामुळे असलेली अस्वस्थता शहांच्या भाषणातून पुन्हा बाहेर पडली. ते म्हणाले, ""जे स्वतः एका गैरव्यवहारात जामिनावर बाहेर आहेत, तेच आरोप करत आहेत. पण जनता यांच्यापेक्षा समजूतदार आहे. यांच्या काळात सुखाने राहणारे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी असे घोटाळेबाज मोदी सरकार येताच पळून गेले; पण देशाचा चौकीदार या साऱ्यांना परत आणूनच स्वस्थ बसेल.'' 

जनतेला पटवून द्या 
अमित शहा यांनी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा मांडताच साऱ्या मंडपातून जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. बऱ्याच वेळ टाळ्या व घोषणा सुरू होत्या. त्या संपल्यावर शहा म्हणाले, ""राममंदिर अयोध्येत जन्मभूमीवरच बनणार तेही लवकरच ही काळ्या दगडावरील रेघ आहे. पण कॉंग्रेस याच्या न्यायालयीन सुनावणीतही अडथळे आणत आहे. मात्र आम्हीच मंदिर बनवणार व लवकरच बनवणार याची भाजप कार्यकर्त्यांनी खात्री बाळगावी व जनतेला तसे पटवून द्यावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com