मणिपूरमध्येही भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी पत्रकार परिषदेत नॅशनल पीपल्स पक्ष आणि लोकजन शक्ती पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या उपस्थितीत मणिपूरमध्ये भाजपचे सरकार सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला.

इम्फाळ - मणिपूरमध्ये कॉंग्रेसने सर्वाधिक जागा मिळवूनही भारतीय जनता पक्षाने तेथील नॅशनल पीपल्स पक्ष आणि लोकजन शक्तीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला. या घोषणेनंतर कॉंग्रेसने जोरदार टीका करताना सर्वाधिक जागा मिळालेल्या जनाधाराचा आदर करत सरकार स्थापनेची संधी मिळावी, अशी मागणी करत भाजपच्या डावपेचांवर जोरदार टीका केली. 

भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी पत्रकार परिषदेत नॅशनल पीपल्स पक्ष आणि लोकजन शक्ती पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या उपस्थितीत मणिपूरमध्ये भाजपचे सरकार सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला. "एनपीपी'ला चार, तर "एलजेपी'ला एक जागा मिळाली आहे. भाजपने 21 जागा जिंकल्या आहेत. या तिघांच्या एकत्रित 26 जागा होत असून, सत्तास्थापनेसाठी आणखी पाच जागांची गरज आहे. चार जागा जिंकलेल्या नागा पीपल्स फ्रंटबरोबर वाटाघाटी सुरू असून, त्यांचाही पाठिंबा मिळणार आहे. आणखी एका आमदाराचा पाठिंबा मिळविल्यास सत्ता स्थापन करण्यात अडचण नसल्याचा दावा माधव यांनी केला. तृणमूल कॉंग्रेसच्या निवडून आलेल्या एकमेव आमदारानेही भाजपला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. 

दरम्यान, "एनपीपी'चे प्रमुख कानोर्ड संगमा यांनी केंद्रात एक राज्यमंत्रिपदाच्या बदल्यात भाजपला पाठिंबा देण्याची अट ठेवली आहे. मार्च 2018 मध्ये मिझारोमची निवडणूक होत असून, तेथे यापूर्वीच भाजपने "एनपीपी'बरोबर युती केली आहे. कानोर्ड संगमा यांना मणिपूरमध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. तसेच मोदी यांनी केंद्रात विस्तार केल्यास संगमा यांच्या पक्षाला एक राज्यमंत्रिपदही हवे आहे. परंतु, मिझोराममध्येही पुढील वर्षी सत्ता मिळविण्यासाठी ही अट भाजप स्वीकारण्यास तयार असल्याचे दिल्लीत सूत्रांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: BJP claim govenment formation in Manipur