देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न, नक्षलवादी कनेक्‍शनवरून; भाजपचा कॉंग्रेसवर आरोप 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

कोरेगाव भीमामधील हिंसाचारप्रकरणी अटकेतील नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या पत्राच्या आधारे भाजपने कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. या पूर्वनियोजित हिंसाचारामध्ये कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची होती. नक्षलवाद्यांना आर्थिक आणि कायदेशीर मदत देऊन देशात अराजकता निर्माण करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोपही भाजपने केला. 

नवी दिल्ली - कोरेगाव भीमामधील हिंसाचारप्रकरणी अटकेतील नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या पत्राच्या आधारे भाजपने कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. या पूर्वनियोजित हिंसाचारामध्ये कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची होती. नक्षलवाद्यांना आर्थिक आणि कायदेशीर मदत देऊन देशात अराजकता निर्माण करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोपही भाजपने केला. 

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांनी नक्षलवादी नेत्यांना अटक केल्यानंतर रोना विल्सन याच्या घरातून जप्त केलेल्या संगणकामधून हाती लागलेल्या संवेदनशील पत्राच्या आधारे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसवर नक्षलवाद्यांशी संबंधाचा हल्ला चढवला. यूपीए सरकारच्या काळात बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचा कोरेगाव भीमा हिंसाचारामध्ये हात असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले असून, कॉंग्रेसचा बुरखा फाडणारे हे पत्र असल्याचा टोला पात्रा यांनी लगावला. मात्र, हे पत्र आपण पोलिसांकडून नव्हे, तर प्रसारमाध्यमांकडून मिळवले असल्याचे स्पष्टीकरणही भाजप प्रवक्‍त्याने दिले. 

दलितांमध्ये असंतोष भडकावण्यासाठी कॉंग्रेस माओवाद्यांना जिग्नेश मेवाणीच्या माध्यमातून आर्थिक आणि कायदेशीर मदत देण्यासाठी तयार असल्याचे पत्रात म्हटले आहे, असा दाखला देत भाजप प्रवक्‍त्याने सांगितले, की गुजरातमध्ये जसे वातावरण निर्माण केले होते, तशा प्रकारे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपली मदत घ्या, असे कॉंग्रसचे म्हणणे आहे. अटकेतील नक्षलवादी कोबाड आणि प्रा. साई यांना सोडविण्यासाठी कॉंग्रेस मदत करेल, हा उल्लेखदेखील पत्रामध्ये असून, युनायटेड स्टुडंट्‌स डेमोक्रेटिक फ्रंटच्या माध्यमातून भाजपशासीत राज्यांमध्ये अराजकता, गोंधळाचे वातावरण तयार करण्याबद्दलही म्हटले आहे. 

एकीकडे भाजप अध्यक्ष दारोदारी जाऊन संपर्क आणि पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना, कॉंग्रेस मात्र अराजकतेतून सत्तेत जाण्याचा प्रयत्न करीत आहे. कॉंग्रेस आणि नक्षलवाद्यांची ही युती आहे. कॉंग्रेसची सत्तेची भूक यापूर्वी कधीही उघड झाली नव्हती. कॉंग्रेसवर हे गंभीर आरोप असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर उत्तर द्यावे. - संबित पात्रा, भाजप प्रवक्ते 
 

Web Title: BJP criticise on congress