भाजपकडून आणीबाणीच्या पानभर जाहिरीती, ढिगभर चर्चासत्रे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

नवी दिल्ली - चर्चासत्रे, मेळावे, पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांचे दौरे, पुस्तक प्रकाशन आणि प्रदर्शनांचे आयोजन, जाहीर सभा व भाषणे, ट्विट्‌सचा पाऊस व वृत्तपत्रांत पानपानभर जाहिराती अशा चहूबाजूंनी सत्तारूढ भाजपने काळा दिवस पाळून आणीबाणीच्या व ‘मिसा’ कायद्याच्या आठवणी ताज्या केल्या. मात्र काळा दिवस पाळण्याच्या संकल्पनेच्या जनकांपैकी असलेले लालकृष्ण अडवानी व मुरलीमनोहर जोशी हे भाजपचे दोघे संस्थापक मौनात गेल्याचे दिसून आले.  

नवी दिल्ली - चर्चासत्रे, मेळावे, पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांचे दौरे, पुस्तक प्रकाशन आणि प्रदर्शनांचे आयोजन, जाहीर सभा व भाषणे, ट्विट्‌सचा पाऊस व वृत्तपत्रांत पानपानभर जाहिराती अशा चहूबाजूंनी सत्तारूढ भाजपने काळा दिवस पाळून आणीबाणीच्या व ‘मिसा’ कायद्याच्या आठवणी ताज्या केल्या. मात्र काळा दिवस पाळण्याच्या संकल्पनेच्या जनकांपैकी असलेले लालकृष्ण अडवानी व मुरलीमनोहर जोशी हे भाजपचे दोघे संस्थापक मौनात गेल्याचे दिसून आले.  

देशात १९८० पासून सलगपणे २६ जूनला काळा दिवस पाळणाऱ्या भाजपने आजच्या त्रेचाळिसाव्या काळ्या दिवशी काँग्रेसवर देशभरात धारदार हल्ले चढविले. पंतप्रधानांसह भाजपचे अध्यक्ष अमित शहा (गुजरात), रविशंकर प्रसाद (दिल्ली), प्रकाश जावडेकर (राजस्थान), जितेंद्रसिंह (आसाम), स्मृती इराणी (ओडिशा), जे. पी. नड्डा (उत्तराखंड), महेश शर्मा (पंजाब), एम. जे. अकबर (कर्नाटक), धर्मेंद्र प्रधान (छत्तीसगड), व्ही. के. सिंह (आंध्र प्रदेश), बी. एस. येडियुरप्पा (कर्नाटक) आदी नेत्यांनी देशाच्या विविध राज्यांत जाऊन आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका करण्याची संधी साधली.

अडवानी, जोशींचे मौन
गेली अनेक वर्षे जनसंघ व भाजपतर्फे होणाऱ्या काळ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे ‘नायक’ असलेले लालकृष्ण अडवानी यांच्याकडून आजच्या दिवशी साधा बाईटही आला नाही. काही वृत्तपत्रे व वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न केले तेव्हा त्यांना, ‘दुसऱ्यांकडून आणीबाणीचा बाईट घ्या,’ असा संदेश देण्यात आल्याचे समजते. अडवानी व मुरलीमनोहर जोशी या दोघांचीही शांतता राजकीय वर्तुळात सूचक मानली जाते. अडवानींनी तर मोदी सरकार सत्तेवर आल्याआल्याच (२०१४) दुसऱ्या आणीबाणीची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर या दिवशीही त्यांच्या वाणीवर वर्षागणिक बंधने आल्याचे दिसत आहे. आज तर त्यांच्याकडून एकही वक्तव्य आले नाही.

केवळ संघ, समाजवादीच लढले - जेटली
आणीबाणीच्या मुद्यावरून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सातत्याने काँग्रेसला धारेवर धरणारे केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी आज डाव्या पक्षांवर निशाणा साधला. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्याविरोधात केवळ समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आवाज उठविला होता. या वेळी डाव्या पक्षांनी मात्र मौन पत्कारले होते, असे त्यांनी म्हटले आहे.

लोहियांचा वारसा सांगणारा मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष काँग्रेससोबत व्यवहार करू शकतो का? भारतातील डावे पक्ष हे नेहमीच माझ्यासाठी कोडे होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निर्लज्जपणे आणीबाणीचे समर्थन केले होते, असेही जेटली यांनी आज फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

ओवेसी विरुद्ध पात्रा
आणीबाणीवरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधायला सुरवात केल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांच्यात चांगलेच वाक्‌युद्ध भडकले. गुजरात दंगल, बाबरी मशीद विध्वंस यांना उजाळा देताना ओवेसी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येला देखील कधीच विसरता येणार नाही असे विधान केले. यावर संतापलेले भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ओवेसी यांची तुलना चक्क जिनांशी केली. यावर ओवेसी यांनीही सडेतोड उत्तर दिले. मी लहान मुलांशी वाद घालत नाही, सामना हा दोन मोठ्या माणसांत असतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे वक्तव्य भाजपला चांगलेच झोंबले आहे.

लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांचा गळा घोटण्यात काँग्रेस पक्ष हा अट्टल गुन्हेगार असून, या पक्षाचा आणीबाणीच्या लोकशाहीविरोधी मानसिकतेवर विश्‍वास आहे.
- मुख्तार अब्बास नक्वी, भाजप नेते

Web Title: BJP criticize Emergency and Congress Politics