गोवा, मणिपूरमध्ये भाजपने धाडस करू नये- कॉंग्रेसचा इशारा

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरील जनमत संग्रह असल्याचा भाजपचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

नवी दिल्ली : गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने तेथे सत्तेसाठीचे धाडस पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी करू नये, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशामागे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांतील फेरफार कारणीभूत असल्याच्या बसप नेत्या मायावतींच्या आरोपांचे निरसन निवडणूक आयोगाने करावे, असे आवाहन कॉंग्रेसने केले आहे.

मायावती यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्‍तेरणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले. प्रमुख राजकीय पक्षाच्या जबाबदार नेत्या असलेल्या मायावतींनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केला आहे. यातून लोकशाही प्रक्रियेच्या सचोटीवरच शंका उपस्थित होत असल्याने हा संशय दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आयोगाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर शंकेचे निरसन करावे, असे सुरजेवाला म्हणाले.

तसेच विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरील जनमत संग्रह असल्याचा भाजपचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. तसे असेल तर पंजाबमध्ये कॉंग्रेसला मिळालेला विजय आणि भाजपला मिळालेल्या अवघ्या दोन जागा, गोव्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव आणि मणिपूरमध्ये बहुमतापासून भाजपचे लांब राहणे यातून काय सिद्ध होते, असा सवाल सुरजेवाला यांनी केला. नोटाबंदी म्हणजे आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा असून, कॉंग्रेस याविरोधात बोलणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंजाब वगळता उर्वरित चारही राज्यांत भाजप सरकार बनवेल, या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या दाव्याची कॉंग्रेस प्रवक्‍ते सुरजेवाला यांनी खिल्ली उडवली. मणिपूर, गोवा या राज्यांमध्ये जनादेश पूर्णपणे कॉंग्रेसच्या बाजूने असून, इतर मित्रपक्षांनीही कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. असे असताना "अरुणाचल प्रदेश'प्रमाणे अस्थिरतेचे षङयंत्र भाजपने करू नये. मोदी-अमित शहा असे धाडस करणार नाही, अशी इशारेवजा टिप्पणीही सुरजेवाला यांनी केली. कॉंग्रेसला पर्याय बनू पाहणाऱ्यांचे स्वप्न धराशायी झाले, असा टोलाही सुरजेवाला यांनी पंजाबच्या निकालावरून आम आदमी पक्षाला लगावला.

Web Title: bjp dare not in goa, manipur, congress intimates modi