उत्तर प्रदेशात भाजपचा ध्रुवीकरणावरच जोर

उत्तर प्रदेशात भाजपचा ध्रुवीकरणावरच जोर

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशाच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी 149 उमेदवारांची, तर उत्तराखंडच्या 70 पैकी 64 उमेदवारांची यादी अखेर आज जारी केली. दोन्ही राज्यांत सध्याच्या आमदारांना हात लावण्याचे काम भाजप नेतृत्वाने केलेले नाही. संगीत सोम (सरधना) व सुरेश राणा (थाना भवन) या वादग्रस्त आमदारांना पुन्हा तिकिटे देऊन विशेषतः पश्‍चिम उत्तर प्रदेशात आपण ध्रुवीकरणावरच भर देणार असल्याचेच भाजपने दाखवून दिले आहे. या टप्प्यात एकाही अल्पसंख्यकास तिकीट न देऊन भाजपने सर्व समाजघटकांना स्थान दिल्याचा स्वतःचाच दावा खोटा ठरविला आहे. बाकी नावांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उद्या (ता. 17) पुन्हा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल.

भाजपने आणि मोदी यांनी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या उत्तर प्रदेशात बंडखोरीचा मोठा धोका पहाता, ही यादी अतिशय काळजीपूर्वक बनविल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे नोएडा, लखनौ, वाराणसी व दादरीसारख्या मतदारसंघांतील नावे आज जाहीर केली गेली नाहीत. महंमद अखलाख यांच्या हत्येने गाजणाऱ्या दादरीतून वादग्रस्त तेजपाल नागर यांना तिकीट देण्यात आले आहे. ही यादी पहाता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापेक्षाही उत्तर प्रदेशाबाबत अरुण जेटली यांचाच शब्द वरचढ ठरल्याचेही निरीक्षण नोंदविले जाते. माध्यम विभाग प्रमुख श्रीकांत शर्मा यांना मथुरेतून घोड्यावर बसविले गेले, तरी त्यांच्या विजयाची फारशी शक्‍यता खुद्द भाजप वर्तुळातच वर्तविली जात नाही. माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री राजनाथसिंह हे आपले पुत्र पंकजसिंह यांच्यासाठी साहिबाबादमधून तिकीट मागत असले तरी पंकजसिंह यांच्याविरोधातील एक कथित गैरव्यवहार प्रकरण पहाता त्यांना तिकीट देण्यास पक्षनेतृत्व तयार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे साहिबाबादचाही उमेदवार आज जाहीर केला गेला नाही. भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी आज पंजाबमधील उर्वरित सहा व गोव्यातील सात उमेदवारांची नावेही जाहीर केली. पंजाबात पंचाहत्तरी पार केलेल्या दोन आमदारांची तिकिटे कापली तरी यातील एकाचे पुत्र मनोरंजन कालिया यांना तिकीट मिळाले आहे.

उत्तर प्रदेशातील अन्य प्रमुख चेहऱ्यांत माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी (मेरठ) यांच्यासह योगेश थामा (बागपत), अतुल गर्ग (गाझियाबाद), तेजपाल नागर (दादरी), संजीव राजा (अलिगड), डॉ. धर्मेश, जोगेंद्र गर्ग, देमलता दिवाण व योगेंद्र उपाध्याय (आग्रा कॅन्ट, आग्रा ग्रामीण, आग्रा परिक्षेत्र व आग्रा), संजय गंगवार (पिलिभीत), पंकज गुप्ता (उन्नाव), राधामोहन अग्रवाल (गोरखपूर) आदी ठळक नावांचा समावेश आहे. या यादीकडे नजर टाकल्यास दणदणीत मुस्लिम मतदारसंख्या असलेल्या पश्‍चिम उत्तर प्रदेशात भाजपने ध्रुवीकरणाचे कार्ड खेळण्याचे निश्‍चित केल्याचे दिसत आहे.

आयाराम-गयारामांना लाभ
उत्तराखंडमध्येही सर्वच्या सर्व आमदारांना व आयाराम-गयारामांना भाजपने मुक्तपणे तिकिटे दिली आहेत. कॉंग्रेसमधून आलेले हरकसिंह रावत (कोटद्वार) व आजच भाजपमध्ये आलेले यशपाल आर्य यांच्या मुलासह माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र सौरभ यांनाही भाजपचे तिकीट मिळाले आहे. या राज्यातील भगतसिंह कोशियारी व बी. सी. खंडुरी यांच्यासह भाजपच्या चारही माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा ते पद मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत खुद्द पंतप्रधानांनीच दिले आहेत. उत्तर प्रदेशात 11 व 15 फेब्रुवारीला पहिल्या दोन टप्प्यांचे तर उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.


. . . . . .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com