भाजपचा विजय सुकमातील हुतात्म्यांना समर्पित

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

दिल्लीतील तीनही महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसत आहे. भाजपने हा विजय सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित केला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील तीनही महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने हा विजय सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित केला आहे.

भाजपच्या '11, अशोका रोड' येथील मुख्यालयाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर 'मॉं तुझे सलाम, सुकमा शहीदों को समर्पित है यह जीत' असा हिंदी भाषेत संदेश लिहिला आहे. पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मनोज तिवारी यांच्या छायाचित्रही लावण्यात आले आहे. तीनही महानगरपालिकेतील एकूण 270 जागांपैकी 180 जागांवर भाजपने आघाडी मिळविली आहे. दरम्यान आम आदमी पक्षासह काँग्रेसही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काँग्रेस नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी काँग्रेसने प्रभावी प्रचार केला नसल्याची टीका करत 'मला प्रचार करण्यास सांगितले नाही म्हणून मी प्रचारात उतरले नाही', असेही म्हटले आहे. तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील एक वर्ष कोणत्याही पदावर न राहता पक्ष कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचेही माकन यांनी जाहिर केले आहे. 'भाजप नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याविषयी पुस्तक लिहिले आहे आणि आता तेच नेते ईव्हीएममध्ये काहीही दोष नसल्याचे म्हणत आहेत', अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.

आतापर्यंत हाती आलेले कल खालीलप्रमाणे
■ उत्तर दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 103)
भाजप - 63; आप - 24; काँग्रेस - 13; अन्य - 3

■ पूर्व दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 63)
भाजप - 47; आप - 9; काँग्रेस - 4; अन्य - 3

■ दक्षिण दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 104)
भाजप - 70; आप - 16; काँग्रेस - 12; अन्य - 6

Web Title: BJP dedicates MCD win to Sukma bravehearts