वाराणसीत पंतप्रधानांसह 25 मंत्र्यांचा तळ कशासाठी?

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

'उत्तर प्रदेशाचे घोडेमैदान प्रत्यक्षात सुरू झाल्याने भाजप चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे ते आवश्यकतेपेक्षा अधिक लोक येथे उतरवित आहेत,' असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, भाजप नेत्यांनी चिंताग्रस्त असल्याचा इन्कार केला. 

वाराणसी : तीर्थक्षेत्र आणि प्राचीन शहर म्हणून ओळखले जाणारी वाराणसी आता जणू राजकीय राजधानी भासू लागली आहे. कारण, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी तब्बल 25 पेक्षा अधिक मंत्री उत्तर प्रदेशच्या राजकीय आखाड्यात उतरविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मागील तीन दिवसांपासून येथे तळ ठोकून आहेत. भाजप 'नर्व्हस' असल्याने हा खटाटोप सुरू असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून संसदेत गेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात विधानसभेचे निकाल कसे लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकांचे पूर्व उत्तर प्रदेशातील अखेरच्या दोन टप्प्यांतील प्रचाराला वेग आला आहे. 

स्वतः मोदी यांनी येथे रोड शो करीत असून, मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 
'उत्तर प्रदेशाचे घोडेमैदान प्रत्यक्षात सुरू झाल्याने भाजप चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे ते आवश्यकतेपेक्षा अधिक लोक येथे उतरवित आहेत,' असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, भाजप नेत्यांनी चिंताग्रस्त असल्याचा इन्कार केला. 
त्यांनी सांगितले की, 'राज्याच्या पश्चिम भागात मतदारांचा थंड प्रतिसाद मिळाल्याने पूर्व उत्तर प्रदेशातील 89 जागा जिंकण्यासाठी पक्षाचे पूर्ण क्षमतेने प्रयत्न सुरू आहेत.'
पश्चिम भागात जाट मतदारांचा वरचष्मा असून, नोटाबंदी आणि सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामधील आरक्षणाची मागणी भाजप सरकारने मान्य न केल्याने त्यांच्यावर जाट समाज नाराज आहे.

तसेच, इतर पक्षांतून उमेदवार आयात केल्याने पक्षात अंतर्गत नाराजी असून, विरोधकांना कोणतीही संधी द्यायची नाही, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: bjp Deploys 2 Dozen Top BJP Ministers In Base Varanasi