भाजपच्या 'या' प्रमुख नेत्याचा 'चौकीदारी'ला नकार 

वृत्तसंस्था
Tuesday, 19 March 2019

तिकीटवाटपाच्या तोंडावर उत्तर प्रदेश व बिहारमध्ये भाजपला बंडखोरीच्या सर्वाधिक झळा लागणार याची ही चुणूक दिसत आहे. केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी आपला नवादा मतदारसंघ रामविलास पासवान यांच्या पक्षाला दिल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. 

नवी दिल्ली : "चौकीदार' या कॉंग्रेस नेतृत्वाच्या आरोपाचा चपखल उपयोग करूनच प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांपासून भाजपच्या साऱ्या नेत्यांनी कंबर कसली असून, सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या ट्विटर नावामागे "चौकीदार' अशी जोड दिली. मात्र, भाजपच्या एका नेत्याने अशी पाटी गळ्यात अडकवून घेण्यास साफ नकार दिला आहे. या नेत्याचे नाव पक्षाचा अल्पसंख्याक चेहरा असेलेले माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन. हुसेन यांना भागलपूरमधून तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी आत्यंतिक नाराजीतून पक्षाची बाजू मांडण्यास कॅमेऱ्यासमोर जाण्याचेही गेले तीन दिवस टाळल्याचे दिसत आहे. 

तिकीटवाटपाच्या तोंडावर उत्तर प्रदेश व बिहारमध्ये भाजपला बंडखोरीच्या सर्वाधिक झळा लागणार याची ही चुणूक दिसत आहे. केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी आपला नवादा मतदारसंघ रामविलास पासवान यांच्या पक्षाला दिल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. 

शहानवाज हुसेन हे अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळातील सर्वांत तरुण मंत्री होते व हा देशातील विक्रम आहे. मात्र, नरेंद्र मोदी या नावाशी त्यांनी 2002 नंतर दुरावा ठेवला. परिणामी अलीकडे त्यांचे दिल्लीतील वजन कमी होत गेले. 2014 मधील भाजपच्या लाटेतही हुसेन यांना भागलपूरमधून पराभव स्वीकारावा लागल्यावर भाजपमध्येच आश्‍चर्य व्यक्त झाले होते. त्यांच्याऐवजी मुख्तार अब्बास नक्वी यांचे वजन पक्षात वाढले. शहानवाज यांना यंदा तिकीटच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप नेतृत्वाने नितीशकुमार यांच्याबरोबर केलेल्या युतीत भागलपूर त्यांनाच देऊन टाकले आहे. ही चाल म्हणजे पन्नाशीतील शहानवाज यांच्या राजकीय कारकिर्दीवरच ग्रहण लागल्याचे निदर्शक मानले जाते. मोदींपाठोपाठ भाजप नेत्यांनी "मै हूँ चौकीदार' हा शब्द आपल्या ट्विटर नावामागे लावण्याचा सपाटा लावला. मात्र, हुसेन यांनी ते करण्याचे टाळून पक्षनेतृत्वाला आपल्या मनातील दुःख पोहोचविल्याचे स्पष्ट आहे. 

लढेन तर नवादातूनच : गिरिराज 
गिरिराज सिंह हे भाजपच्या सर्वांत बोलक्‍या मंत्र्यांपैकी एक मानले जातात. गेल्या पाच वर्षांत त्यांनी बिहारमधील नवादा मतदारसंघ मजबुतीने बांधला होता. मात्र भाजपने ही जागाही पासवान यांच्या पक्षाला देऊन टाकल्याने गिरिराजसिंह भडकले. त्यांनी हुसेन यांच्याप्रमाणे शांत न राहता, भाजप प्रदेशाध्यक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपल्याला झुलवत ठेवून दिशाभूल केल्याची जाहीर तोफ डागली आहे. आपण लढू तर नवादातूनच लढू असे सांगून त्यांनी बंडखोरीचेही संकेत पक्षनेतृत्वाला दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp did not give ticket to Shahnawaz Hussain from Bhagalpur