भाजपला बहुमत मिळणार नाही ; जेडीएस, भाकपचा दावा

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्हाला शंभर टक्के पाठबळ आणि सहकार्य आहे. 
- बी. एस. येडियुरप्पा, मुख्यमंत्री, कर्नाटक 

नवी दिल्ली : कर्नाटकात विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ऐतिहासिक असल्याचे सांगत धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले. भाजपला हे बहुमत सिद्ध करण्यात अपयश येईल, असा दावाही त्यांनी या वेळी केला. 

येडियुरप्पा यांनी कालच (ता. 17) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी त्यांना उद्याच राजीनामा द्यावा लागेल, असा विश्‍वास "जेडीएस'चे नेते दानिश अली यांनी केला. आमचे सर्व आमदार आमच्याबरोबरच आहेत, भाजपचा बहुमताचा दावा पोकळ आहे, हे उद्याच सिद्ध होईल, असे ते म्हणाले. भाकप नेते डी. राजा यांनीही भाजपवर टीका केली.

"राजकीय गोंधळामुळे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. भाजपला हा विश्‍वासदर्शक ठराव जिंकता येणार नाही,' असे ते म्हणाले. 

"राज्यपाल हे बाहुले' 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनुसार राज्यपालांनी येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, उद्याचे ते सिद्ध करण्याचे आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेला वाचविले आहे. राज्यपाल हे मोदी आणि शहा यांच्या हातातील बाहुले बनले आहेत,' अशी टीका माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज केली.

कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सर्व विजयी उमेदवारांसह जिंकून आलेले दोन अपक्षही बरोबर असल्याचा दावाही सिद्धरामय्या यांनी या वेळी केला. येडियुरप्पा सरकार विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकेल, असा ठाम विश्‍वास भाजपचे कर्नाटकमधील प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आज व्यक्त केला. या ठराव जिंकण्याची आम्हाला खात्री असल्याचे ते म्हणाले.

 

Web Title: BJP does not get majority says JDS CPI