गोव्यात भाजपला मध्यावधी निवडणुका नकोत : विजय सरदेसाई 

गोव्यात भाजपला मध्यावधी निवडणुका नकोत : विजय सरदेसाई 

मडगाव : गोव्यातील भाजपप्रणीत युती सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असून मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, अशी हमी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली असून हे सरकार स्थिर राखण्याचे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी भाजपवर आहे, असे नगरनियोजन मंत्री व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी येथे सांगितले. आजारपणामुळे मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असतील किवा नसतील पण, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पडेल उमेदवारांनाच मध्यावधी निवडणुका हव्या आहेत. पण, मध्यावधी निवडणुका नकोत ही भाजपची पक्की भूमिका आहे. मध्यावधी निवडणुका होणार नाही अशी हमी अमित शाह यांनी यापूर्वी दिली होती. आजही त्यांच्याशी माझे बोलणे झाले. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असे वचन त्यांनी आम्हाला दिले आहे. वचन पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी दिल्लीत गेलो तेव्हा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर व मी परीर्कर यांना एकत्र भेटलो. सुमारे एक तास त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांची तब्येत चांगली असल्याचे मला यावेळी आढळले. ते आज गोव्यात आले आहेत. त्यांची भेट घेऊन मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.

युती सरकार स्थापन करताना जनतेला आम्ही आश्वासने दिली आहेत. ही आश्वासने व विकासकामे पूर्ण करण्यासाठी सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करणे आवश्यक आहे. पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असले व नसले तरी सर्वधमर्समभाव, गोयकारपण व विकास या सिद्धांतानुसार सरकारला पाच वर्षे पूर्ण करावीच लागतील. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी जे वचन आम्हाला दिले आहे त्याचे पूर्ती झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भावी मुख्यमंत्री म्हणून विश्वजीत राणे यांचे नाव पुढे येत असल्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असा सवाल पत्रकारांनी केला असता पुढील मुख्यमंत्री कोण असतील ते विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सांगावे लागेल असे मत व्यक्त केले. पर्रीकर हे सध्या मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. भावी मुख्यमंत्र्याचा विषय पुढे येईल तेव्हा या विषयाकडे पाहू. भाजप सोबत आमची युती आहे आणि भाजपशी आमचा चांगला ताळमेळ आहे. पर्रीकर आजारी असले तरी ते मुख्यमंत्रीपदी आहेत. समस्त गोमंतकीय जनतेची त्यांना सहानुभूती आहे. ते मुख्यमंत्री पदावर असताना या पदासाठी पर्याय शोधणे हे गोयकारपणाचे प्रतिक नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com