पंजाबमध्ये भाजपला धक्का

पंजाबमध्ये भाजपला धक्का

चंडीगड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, लुधियानातील पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री सतपाल गोसेन यांनी काही नेते व हजारो कार्यकर्त्यांसह आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपसोबत शिरोमणी अकाली दल (एसएडी) व आम आदमी पक्षाचे काही संभाव्य उमेदवारही कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंजाब कॉंग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनी गोसेन व इतरांचे पक्षात स्वागत केले. सतपाल व इतरांनी भाजप सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, भाजपची जनताविरोधी धोरणे व आपमधील भ्रष्टाचार पाहता येथील जनतेसाठी कॉंग्रेस हाच उत्तम पर्याय असल्याचे अमरिंदर सिंग यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. गोसेन हे लुधियाना मतदारसंघातून सलग तीनदा निवडून आले आहेत. त्यांच्यासह अमित गोसेन आणि गुरुदीपसिंग नितू यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, आपच्या मौर मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सिमरत कौर धलिवाल यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली असून, आपल्याकडे तिकिटासाठी 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंजाबमधील जनतेला आपने दिलेले आश्वासने फसवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. धलिवाल यांसह आप नेते अशोक पराशर हेही कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत. आपल्या स्वार्थासाठी आपकडून जनतेचे शोषण होत असल्याचा आरोप पराशर यांनी केला आहे. पाच महिन्यांपूर्वी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राकेश पराशर हे कॉंग्रेसमध्ये परतण्याच्या मार्गावर आहेत.

शिरोमणी अकाली दलाचे वीरेंदर गोयल यांनीही हजारो समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असून, कॉंग्रेसमधून शिरोमणी अकाली दलात गेलेले जगमोहन शर्मा हेही पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले आहेत. एसएडी हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष असल्याची टीका शर्मा यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com