गोव्यात भाजप सरकारला धक्का; काँग्रेसच्या हालचाली

अवित बगळे
गुरुवार, 24 मे 2018

भाजपच्या आघाडी सरकारमध्ये मगो, गोवा फॉरवर्ड आणि तीन अपक्षांचा समावेश आहे. कालपर्यंत गोवा फॉरवर्ड पक्षाकडून पुढील निवडणुकीत आम्ही कॉंग्रेसचे आमदार असलेल्या मतदारसंघात लढू असे सांगण्यात येत होते. आज मात्र भाजपचा आमदार असलेल्या मये मतदारसंघातील कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार संतोष सावंत यांना गोवा फॉरवर्डने प्रवेश दिला. यावरून आघाडीतील सारेकाही आलबेल नसल्याचे दिसते.

पणजी : गोव्यातील भाजप आघाडी सरकारला हादरे बसणे सुरु झाले आहे. कर्नाटकात धर्ननिरपेक्ष जनता दल (धजद), काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर गोव्यातील काँग्रेस नेत्यांचा उत्साह दुणावला आहे. त्याच उत्साहाच्या भरात त्यांनी सरकार स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत बोलणी सुरु केली आहेत.

काँग्रेसचे 40 जागांच्या विधानसभेत सध्या 16 आमदार असून त्यांना बहुमतासाठी पाच आमदारांची गरज आहे. मगोकडे तीन आमदार असून काँग्रेसने पाठींबा दिलेला एक अपक्ष निवडून आला आहे. त्यामुळे आता सरकार स्थापनेसाठी केवळ एका अपक्षाचा पाठींबा बाकी आहे अशी काँग्रेसच्या नेत्यांची भावना बनली आहे. असे करताना तीन आमदार असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाकडे मात्र कॉंग्रेसने दुर्लक्ष केले आहे.

भाजपच्या आघाडी सरकारमध्ये मगो, गोवा फॉरवर्ड आणि तीन अपक्षांचा समावेश आहे. कालपर्यंत गोवा फॉरवर्ड पक्षाकडून पुढील निवडणुकीत आम्ही कॉंग्रेसचे आमदार असलेल्या मतदारसंघात लढू असे सांगण्यात येत होते. आज मात्र भाजपचा आमदार असलेल्या मये मतदारसंघातील कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार संतोष सावंत यांना गोवा फॉरवर्डने प्रवेश दिला. यावरून आघाडीतील सारेकाही आलबेल नसल्याचे दिसते.

त्याही पुढे जात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि भाजप आघाडी सरकारमधील नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी आम्हाला सहभागी केल्याशिवाय कॉंग्रेसने सरकार घडवून दाखवावे असे आव्हान दिले आहे. याचा अर्थ सरदेसाई हे सुद्धा सरकारमध्ये सहभागी होण्यास इच्छूक असल्याचे काढला जात आहे. सरदेसाई यांच्या मागण्या जरा जास्तच असल्याने आम्हाला ते परवडणारे नाहीत असे सरकार स्थापनेसाठी बोलणी करण्यासाठी कॉंग्रेसने नेमलेल्या दोनपैकी एका नेत्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

कर्नाटकमध्ये धजदच्या जागा कमी असूनही धजदला मुख्यमंत्रीपद दिले तसे मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांना कॉंग्रेस गोव्यात मुख्यमंत्रीपद देऊ शकते. मात्र ढवळीकर यांनी तशी शक्यता फेटाळली आहे. मी सध्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी कोणाशी बोलणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

मध्यंतरी खाणकाम बंदीनंतर सरकार काही करत नाही म्हणून भाजपचे मित्रपक्ष आणि अपक्षांनी सरकारविरोधी राग आळवणे सुरु केले होेते. त्यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात येऊन सर्वांना समजावले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी अमेरीकेत असल्याने येथे भाजपला कोणी तारणहार नाही असे चित्र निर्माण झाले असून त्यातच हे हादरे बसणे सुरु झाले आहे.

Web Title: BJP government danger zone in Goa