युपी सरकारचा जात, धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न : मायावती

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

मायावती म्हणाल्या, 'आता मी रस्त्याने सहारनपूरला जात आहे. मला किंवा माझ्या पक्षाच्या कोणालाही काहीही झाले तर त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारची असेल.'

लखनौ (उत्तर प्रदेश) : सहारनपूरमध्ये होत असलेल्या हिंसेला सरकार जबाबदार असल्याचे म्हणत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशचे सरकार जात, धर्माच्या नावावर राज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

शुक्रवारी सहारनपूर येथे ठाकूर समुदायाने महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीला दलितांनी विरोध केला. त्यामुळे दोन्ही गटात झालेल्या हाणामारी झाली होती. त्यामध्ये एक जण ठार तर 15 जण जखमी झाले होते. या पार्श्‍वभूमीवर मायावती सहारपूरच्या दौऱ्याला जाणार होत्या. मात्र हेलिकॉप्टरने सहारनपूरचा दौरा करण्याची मायावती यांची मागणी मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी अमान्य केली. मागणी अमान्य करताना अशा दौऱ्यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची परवानगी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना मायावती म्हणाल्या, "आता मी रस्त्याने सहारनपूरला जात आहे. मला किंवा माझ्या पक्षाच्या कोणालाही काहीही झाले तर त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारची असेल.'

बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते शिस्तबद्ध असून ते कधीही कायदा आपल्या हाती घेणार नाहीत, असेही मायवाती यांनी यावेळी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मायावती यांनी सहकार्य करण्याची सूचना भारतीय जनता पक्षाने केले आहे.

Web Title: BJP Government is dividing the Uttar Pradesh on the grounds of caste and religion : Mayawati