भाजप कार्यकारिणी बैठक नवी दिल्लीत लवकरच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जानेवारी 2017

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा येत्या दोन दिवसांत कधीही जाहीर होऊ शकतात व नंतर पंतप्रधान व भाजप अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांना वेळ मिळणार नाही त्यामुळे आगामी आठवडाभरात ही बैठक दिल्लीत घेतली जाईल अशी चिन्हे आहेत. भाजपच्या घटनेनुसार तीन ते सहा महिन्यांतून एकदा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणे अपेक्षित असते. केरळ कार्यकारिणी सप्टेंबरमध्ये झाली होती

नवी दिल्ली - सत्तारूढ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. साधारणतः दहा जानेवारीच्या आत राजधानी नवी दिल्लीत होऊ घातलेल्या या बैठकीत बहुतांश चर्चा उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठेची विधानसभा निवडणूक व त्या अनुषंगाने पंजाबसह अन्य चार राज्यांतील निवडणुका यांची तयारी याभोवतीच ही बैठक फिरणार असे स्पष्ट संकेत आहेत.

भाजप कार्यकारिणीची बैठक पुढच्या आठवड्यात दिल्लीतील "एनडीएमसी' सभागृहात होणार असल्याच्या वृत्ताला पक्षसूत्रांनी दुजोरा दिला. मात्र भाजपमध्ये मोदीयुगाचा प्रारंभ झाल्यापासून गेल्या अडीच वर्षांतील प्रथेनुसार याबाबत पक्षनेते उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. सात व आठ जानेवारीला ही बैठक होऊ शकते. यात आर्थिक व राजकीय असे दोन ठराव मंजूर होतील. त्याआधी राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल व राम माधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या देशभरातील संघटनमंत्र्यांची बैठक चार व पाच जानेवारीला गुजरातमध्ये होणार आहे. संघटनमंत्री हे संघाने भाजपमध्ये थेट नियुक्त केलेले स्वयंसेवक असतात हे लक्षात घेतले, तर या बैठकीचाही उद्देश भाजप कार्यकारिणी बैठकीची वातावरणनिर्मिती हा असेल हे स्पष्ट आहे.

मोदी सरकारने गेल्या सात दशकांची परंपरा मोडून अलीकडे आणलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी भाजपची ही बैठक घेण्यात येईल. मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा येत्या दोन दिवसांत कधीही जाहीर होऊ शकतात व नंतर पंतप्रधान व भाजप अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांना वेळ मिळणार नाही त्यामुळे आगामी आठवडाभरात ही बैठक दिल्लीत घेतली जाईल अशी चिन्हे आहेत. भाजपच्या घटनेनुसार तीन ते सहा महिन्यांतून एकदा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणे अपेक्षित असते. केरळ कार्यकारिणी सप्टेंबरमध्ये झाली होती. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सुमारे चारशे सदस्य या बैठकीसाठी निमंत्रित आहेत. त्यातही उत्तर प्रदेशातील निमंत्रितांना या बैठकीत बोलण्याची विशेष संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. या वर्षी पूर्वीर्धात पंजाब, उत्तराखंड, गोवा आदी चार राज्यांच्याही निवडणुका आहेत. मोदी व पर्यायाने शहा यांनी उत्तर प्रदेश रणधुमाळी हा विषय प्रतिष्ठेचा बनविल्याने त्यावर कार्यकारिणी बैठकीचा सारा जोर असेल हे उघड आहे. उत्तर प्रदेशात सर्व केंद्रीय मंत्री, भाजप मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह प्रमुख नेत्यांना सभा घेण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: BJP to hold sensitive national level meeting