पुन्हा भाजपच श्रीमंत; 'एडीआर'चा अहवाल 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

लेखापरीक्षण अहवालास विलंब 
गेल्या पाच वर्षांपासून प्रमुख सहा राष्ट्रीय पक्षांपैकी चार पक्षांनी (भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सीपीआय) सातत्याने लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करण्यास विलंब केला असल्याचे "एडीआर'ने नमूद केले आहे. 

नवी दिल्ली : देशातील सात राष्ट्रीय पक्षांनी 2016-17 चे एकूण उत्पन्न जाहीर केले असून, यामध्ये सर्वाधिक श्रीमंत पक्षाच्या यादीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. 10.34 अब्ज रुपयांच्या (1,034 कोटी रुपये) संपत्तीसह भाजप श्रीमंत पक्षांच्या यादीत सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. सात राष्ट्रीय पक्षांची एकूण संपत्ती 15.59 अब्ज रुपये (1 हजार 559 कोटी रुपये) आहे. 

यासंबंधी "असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म'ने (एडीआर) यासंदर्भात अहवाल सादर करत प्रमुख राजकीय पक्षांच्या संपत्तीची आकडेवारी प्रसिद्ध केली. भाजपनंतर कॉंग्रेस पक्षाची एकूण संपत्ती 2.25 अब्ज रुपये (225 कोटी रुपये) आहे. राजकीय पक्षांच्या एकूण संपत्तीत कॉंग्रेसच्या संपत्तीचा 14.2 टक्के वाटा आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने सर्वांत कमी 20.8 दशलक्ष संपत्तीची नोंद केली आहे. सर्व पक्षांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या माहितीवरून "एडीआर'ने हा अहवाल सादर केला आहे. 

बहुजन समाज पक्षाची 2016-17 वर्षातील एकूण संपत्ती 1.73 अब्ज रुपये (173 कोटी रुपये) असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बसपच्या संपत्तीत 266.32 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 2015-16 मध्ये बसपची एकूण संपत्ती 47.72 कोटी रुपये होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची एकूण संपत्ती 17.235 कोटी रुपये असून, पक्षाच्या एकूण संपत्तीत 81.52 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 2015-16 मध्ये राष्ट्रवादीची एकूण संपत्ती 9.137 कोटी रुपये होती. 

भाजप, कॉंग्रेससह बहुतांश राष्ट्रीय पक्षांनी त्यांच्या संपत्तीचे प्रमुख स्रोत हे निधी व योगदान असल्याचे म्हटले आहे. भाजपने 2016-17 या वर्षामध्ये निवडणुका व सर्वसामान्य प्रचारासाठी 606.64 कोटी रुपये खर्च केले असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर प्रशासकीय खर्च 69.65 कोटी रुपये दाखविला आहे. कॉंग्रेसने निवडणुका व सर्वसामान्य प्रचारासाठी 149.65 कोटी रुपये खर्च केले असून, 115.65 कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय योजना व साधारण बाबींवर खर्च केला आहे. 

लेखापरीक्षण अहवालास विलंब 
गेल्या पाच वर्षांपासून प्रमुख सहा राष्ट्रीय पक्षांपैकी चार पक्षांनी (भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सीपीआय) सातत्याने लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करण्यास विलंब केला असल्याचे "एडीआर'ने नमूद केले आहे. 

प्रमुख पक्षांच्या मालमत्ता 
पक्ष मालमत्ता (कोटी रुपयांमध्ये) 
भाजप 1,034 
कॉंग्रेस 225 
बसप 173 
राष्ट्रवादी 17.235 
माकप 2.08 

Web Title: BJP India's richest party with declared assets worth Rs 893 crore