
Rahul Gandhi News : 'सावरकर समझा क्या…' काँग्रेसच्या ट्वीटला भाजप नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणे, मी हात जोडून…
दिल्ली पोलिसांनी रविवारी (19 मार्च) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या महिलांचा लैंगिक छळासंबंधी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. पोलिसांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी स्वतःची कार चालवत निवासस्थानाबाहेर पडले. यानंतर कार चालवतानाचा फोटो ट्विट करताना काँग्रेसने लिहिले की, "सावरकर समझा क्या, नाम- राहुल गांधी है."
काँग्रेसच्या या ट्विटला आता भाजपनेही प्रत्युत्तर दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, कृपया महान आत्मा वीर सावरकरांचा अपमान करू नका. मी हात जोडून विनंती करत आहे.
दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या घरी पोहोचले
दरम्यान रविवारी दिल्ली पोलिसांचे पथक भारत जोडो यात्रेदरम्यान महिलांच्या लैंगिक छळाबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी यासंबंधी काही वक्तव्य केले होते.
राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीचे स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, ही गंभीर बाब आहे, पोलिसांनी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी याबाबत माहिती देणार असल्याचे सांगितले आहे, त्यांना थोडा वेळ हवा आहे.
राहुल गांधी यांनी उत्तर पाठवलं
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर पोलिसांना 4 पानी उत्तर पाठवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना प्राथमिक उत्तर देताना राहुल गांधी यांनी पुढील 8-10 दिवसांत सविस्तर उत्तर देऊ, असे सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांना त्यांच्या सुरुवातीच्या उत्तरात राहुल गांधी म्हणाले की, अदानी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर संसदेत आणि बाहेर त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी पोलिसांच्या कारवाईचा काहीही संबंध नाही, अशी मला आशा आहे. यावर दिल्ली पोलिसांनी सांगितले की काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडून प्राथमिक उत्तर मिळाले आहे, परंतु त्यांनी अशी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही जेणेकरून तपास पुढे नेला जाऊ शकेल.