संत आणि भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा कट: साक्षी महाराज

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

हरियानात घडलेल्या हिंसाचारापेक्षा मोठी घटना घडल्यास केवळ डेरा समर्थकच नव्हे, तर न्यायालयही जबाबदार असेल. एका साध्या माणसाला त्रास दिल्यास काय घडू शकते, हे दिसून आले आहे.

लखनौ - एका व्यक्तीने राम रहीम यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली. कोट्यवधी भक्त त्यांना देव मानतात. यापैकी कोण बरोबर असेल, असे तुम्हाला वाटते? हा फक्त राम रहीम यांना नाहीतर अन्य संत आणि भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा कट आहे, असे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

"डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू गुरमीत राम रहीम सिंग याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने पंधरा वर्षांपूर्वीच्या बलात्कार आणि लैंगिक शोषणप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर हरियाना, पंजाब, राजस्थान आणि दिल्ली या चार राज्यांत हिंसाचाराचा आगडोंब उसळला. न्यायालयाच्या निकालानंतर डेराप्रमुखाचे अनुयायी हिंसक झाले. त्यांनी विविध ठिकाणांवर रेल्वे, बस स्थानके, मॉल, पेट्रोल पंप, सरकारी कार्यालयांच्या इमारतींना आग लावत सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले. "डेरा'चा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचकुला, सिरसामध्ये हिंसक आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. येथे लष्करासही पाचारण करण्यात आले होते. पंचकुलातील हिंसाचारात 30 जण ठार झाले असून, अडीचशेपेक्षाही अधिक जखमी झाले आहेत. पंजाबमधील दहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

याबाबत साक्षी महाराज म्हणाले, की हरियानात घडलेल्या हिंसाचारापेक्षा मोठी घटना घडल्यास केवळ डेरा समर्थकच नव्हे, तर न्यायालयही जबाबदार असेल. एका साध्या माणसाला त्रास दिल्यास काय घडू शकते, हे दिसून आले आहे. हा फक्त बाबा राम रहिम यांच्यासह अन्य संतांना आणि भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा कट आहे.

Web Title: BJP Lawmaker Sakshi Maharaj Says Ram Rahim Being 'Harassed', Attacks Court