मध्य प्रदेशात ऑपरेशन लोट्सच्या यशानंतर आता मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

नव्या नेत्याची निवड करण्यासाठी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक लवकरच होऊ शकते. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या चौहान यांच्याशी स्पर्धा करू शकेल, असा एकही नेता पक्षात नाही, असे भाजपच्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. 

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे पायउतार झाल्यानंतर राज्यात येऊ घातलेल्या भाजपच्या नव्या सरकारचे नेतृत्व कोणाकडे असणार याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे मानले जाते. त्याच बरोबर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांचीही नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, चौहान यांच्या नावाला पक्ष नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळू शकतो, असे मानले जात आहे. 

नव्या नेत्याची निवड करण्यासाठी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक लवकरच होऊ शकते. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या चौहान यांच्याशी स्पर्धा करू शकेल, असा एकही नेता पक्षात नाही, असे भाजपच्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. 

ओबीसींचे राज्यातील मोठे नेते असलेल्या ६१ वर्षीय चौहान यांनी २०१८ पर्यंत सलग तेरा वर्षे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. कॉंग्रेसच्या २२ बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत पक्षाचे नेतृत्व चौहान यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

‘हॉटेल डिप्लोमसी’मुळे लोकशाहीचा खून : काँग्रेस 
मध्य प्रदेशात ‘हॉटेल डिप्लोमसी’ने लोकशाहीचा पराभव केला असल्याची टीका काँग्रेसकडून आज करण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा सादर केल्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र डागण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज ‘हॉटेल डिप्लोमसी’ने लोकशाहीचा पराभव केला आहे. मध्य प्रदेशात दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून झाल्याचे आपण पाहिले आहे. सत्तेच्या लालसेपोटी लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे पाडण्याची भाजपला सवय लागली आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP lead government formed in Madhya Pradesh