गोमांसावरून हत्येप्रकरणी भाजप नेत्याला अटक

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

55 वर्षीय अलिमुद्दीन उर्फ असगर अली यांना कारमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

रामगढ - झारखंडमधील रामगढ येथे गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्यासह दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रामगढ येथे गोमांस बाळगल्याप्रकरणी मुस्लिम व्यापारी अलिमुद्दीन याची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी छोटू राणा हा स्टिकने अलिमुद्दीनला मारहाण करताना स्पष्ट झाले होते. त्यानुसार छोटू राणा याच्यासह नित्यानंद महतो या भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. महतो हा भाजपच्या मिडीया सेलचे काम पाहतो. तर, छोटू राणा हा गो रक्षक समितीशी संबंधित आहे. महतो हा हत्या झालेल्या भागात राहतो. तसेच भाजप मिडीया सेलचे प्रमुख वरुण सिंह यांनी महतो आमच्यासाठी काम करत असल्याचे सांगितले आहे.

दुसरीकडे महतो याने आपल्याला या प्रकरणात अडकवल्याचे म्हटले आहे. हत्येनंतर त्याठिकाणी आपण पोहचल्याचे त्याने म्हटले आहे. 55 वर्षीय अलिमुद्दीन उर्फ असगर अली यांना कारमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या हिंसेवरून खडे बोल सुनावले होते. मात्र, अद्याप गोरक्षकांची मनमानी सुरुच आहे.

Web Title: BJP leader arrested in Muslim trader’s lynching case; prime accused surrenders