भाजप नेत्याने दाबला 'ममता बॅनर्जीं'चा गळा

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जून 2019

लोकसभा निवडणूकीनंतरही भाजप व तृणमूल काँग्रेसमधील सोशल वॉर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

इंदूर: भारतीय जनता पक्षाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गळा दाबल्याचे पोस्टर्स झळकली असून, सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत. भाजप व तृणमूल काँग्रेसमधील सोशल वॉर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपने पश्चिम बंगालच्या 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला जे यश मिळाले आहे, त्यामध्ये कैलाश विजयवर्गीय यांचा मोठा वाटा होता. कैलाश विजयवर्गीय हे आज (मंगळवार) शहरात पोहचले. त्यावेळी तिथे काही पोस्टर्स लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या पोस्टरमध्ये ममता बॅनर्जी यांना बिबट्याच्या रूपात दाखवण्यात आले असून, कैलाश विजयवर्गीय हे ममतांचा गळा दाबत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. या पोस्टर्सने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

कैलाश विजयवर्गीय ज्या बिबट्याचा गळा दाबताना दाखवले आहेत त्या बिबट्याचा चेहरा ममता बॅनर्जी यांचा आहे. कैलाश विजयवर्गीय यांचे समर्थक हे त्यांना बंगाल टायगर म्हणत आहेत. या पोस्टर्समुळे वाद निर्माण झाल्याने आता या पोस्टरवरचा ममता बॅनर्जी यांचा चेहरा झाकण्यात आला आहे. शिवाय, सोशल मीडियावरही ही पोस्टर्स व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाचं फैरी झडत होत्या. आता कैलाश विजयवर्गीय यांच्या या पोस्टरवरूनही वाद निर्माण झाल्याने ममता बॅनर्जींचा फोटो झाकण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader kailash vijayvargiya poster with mamata banerjee image in indore