दिल्लीकरांनी मागितली शाळा, मिळाली मधुशाळा !भाजपचा आप ला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aap

दिल्लीकरांनी मागितली शाळा, मिळाली मधुशाळा !भाजपचा आप ला टोला

नवी दिल्ली : दिल्लीच्या लोकांनी शाळा मागितली होती पण ‘आप' सरकारने साऱया दिल्लीचीच मधुशाळा (मद्यशाळा) करून टाकली असा हल्ला चढवताना भाजपने हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या प्रसिध्द कवितेचे उदाहरण दिले. दारू धोरण व शिक्षण क्षेत्रातील घोटाळे हे केजरीवाल सरकारच्या भ्रष्ट्चाराचे ट्विन टॉवर आहेत व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्याची उभारणी केली असा आरोप भाजपने केला. भ्रष्टाचाराचे आणखी ‘टॉवर' केजरीवाल सरकारने बांधले तेही यथावकाश उघडकीला येतील असाही गर्भीत इशारा भाजपने दिला आहे.

दिल्ली सरकारचे अबकारी धोरण व सरकारी शाळांच्या वर्गखोल्यांच्या कामातील भ्रष्ट्चाराच्या मुद्यावरून भाजपने रान उठवले आहे. भाजप नेत्यांनी दररोज किमान एक पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल सरकारवर हल्लाबोल चढविण्याची रणनीती आखण्यात आली आहे. दुसरीकडे सिसोदिया यांच्याभोवती केंद्र सरकारच्या तपास संस्थांनी चौकशीचा फास आवळला आहे.

खासदार मनोज तिवारी व भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सांगितले की केजरीवाल सरकारने शाळा खोल्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी चक्क स्वच्छतागृहांना वर्ग म्हणऊन दाखविले यापेक्षा मोठा गंभीर प्रकार कोणता असू शकतो ? ज्या खोलीच्या बांधकामासाठी ५ लाख रूपयांचा खर्च येतो त्यासाठी ३३ लाखांचा खर्च दाखविण्यात आला आहे.

केजरीवाल सरकारने, दारू माफियांकडून पैसा जमा करण्याच्या ‘रिव्हर्स रॉबीनहूड' मॉडेल दिल्लीत लागू केले असे सांगताना तिवारी व पूनावाला यांनी मधुशाला कवितेचा दाखला दिला. लोकांनी पाठशाळा मागितली पण आप सरकारने लोकांना मधुशाळा दिली असा आरोप करून ते म्हणाले की नांगलोई भागातील एका शाळेतील जुनाट पंखा एका विद्यार्थीनीच्या अंगावर पडला व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आतापावेतो आप सरकारची कथित नैतिकताच पडत होती, आता जराजर्जर शाळाखोल्यांतील पंखेही विद्यार्थ्यांच्या अंगावर पडू लागले आहेत. अनेक शाळांत अर्धवट व भ्रष्टाचारयुक्त कामे झाल्याने आता विद्यार्थ्यांवरच पंखे कोसळत आहेत असाही त्यांनी आरोप केला.

Web Title: Bjp Leaders Delhi Aap Tola School Got A Madhushala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..