भाजप 6 ठिकाणी आघाडीवर, दिल्लीत आप तिसऱ्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

या मतदारसंघांत झाल्या निवडणुका...
राजुरी गार्डन (दिल्ली), लिटिपरा (झारखंड), नंजनगुड आणि गुंडलुपेट (कर्नाटक), ढोलपूर (राजस्थान), कंठी दक्षिण (पश्चिम बंगाल), अटेर आणि बांधवगड (मध्य प्रदेश), भोरंज (हिमाचल प्रदेश) आणि ढेमाजी (आसाम)
 

नवी दिल्ली : देशभरात आठ राज्यांतील दहा जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये दिल्ली, आसाम, हिमाचलमधील मतमोजणीत सहा जागांवर भाजप आघाडीवर असून, कर्नाटकमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. या पोटनिवडणुकांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान झाले होते.

राजधानी दिल्लीमधील राजुरी गार्डन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील मतमोजणीची पाचवी फेरी संपली तेव्हा भाजपने आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याचे स्पष्ट झाले. सत्तधारी आम आदमी पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. पश्चिम दिल्लीतील या जागेसाठी 47 टक्के म्हणजे सुमारे 1 लाख 60 हजार मतदारांनी मतदान केले होते. 

दिल्लीतील भाजपचे उमेदवार मंजिंदरसिंह सिरसा यांनी पाचव्या फेरीअखेर 13 हजार 542 मते मिळवून काँग्रेसच्या मीनाक्षी चंडेला यांच्यावर सुमारे चार हजार मतांची आघाडी मिळवली होती. तर आम आदमी पक्षाचे हरजीतसिंह यांना 2668 मते मिळाली होती. 

झारखंडमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा झारखंड मुक्ती मोर्चाचे सायमन मरांडी यांना 11 हजार 767 मते मिळाली होती, तर भाजपचे उमेदवार हेमलाल मुरमू यांना 9 हजार 414 मते मिळाली होती. सायमन यांनी एकूण मतांपैकी 45.3 टक्के मते मिळवली आहेत. तसेच, आसाममधील ढेमाजी येथून भाजप उमेदवार 2752 मतांनी आघाडीवर आहे.

Web Title: bjp leads in bypolls, aap trails, congress in karnataka