भाजप सरकार जनतेच्या कल्याणासाठीच पंतप्रधान मोदींचा दावा

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

आमचे सरकार जनतेच्या कल्याणासाठीच काम करत असून, कॉंग्रेस मात्र सरकारविरोधात संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यांनी येथे मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. 
 

राजगड (मध्य प्रदेश): आमचे सरकार जनतेच्या कल्याणासाठीच काम करत असून, कॉंग्रेस मात्र सरकारविरोधात संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यांनी येथे मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. 

प्रकल्पाच्या उद्‌घाटनानंतर एका सार्वजनिक सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. "जनतेचा भाजप सरकारवर विश्‍वास आहे. मात्र जे आमच्याविरोधात अफवा, संभ्रम आणि नकारात्मक भावना पसरवीत आहे, त्यांना वास्तवाचे भान नाही. या देशावर कॉंग्रेसने अनेक दशके राज्य करूनही त्यांनी जनतेवर आणि त्यांच्या कष्टावर कधीही विश्‍वास ठेवला नाही,' असे मोदी म्हणाले. केंद्रातील चार वर्षे आणि मध्य प्रदेशातील तेरा वर्षे भाजपने गरीब, शेतकरी आणि दुर्लक्षित घटकांच्या सबलीकरणासाठी काम केल्याचा दावाही मोदींनी केला. कॉंग्रेसच्या काळात मध्य प्रदेश हे "बिमारू' राज्य म्हणून ओळखले जात होते. भाजपने अथक मेहनत करत हा डाग धुऊन टाकल्याचेही ते म्हणाले. 

मोदींच्या हस्ते आज उद्‌घाटन झालेल्या मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पासाठी 3,866 कोटी रुपये खर्च आला असून, या प्रकल्पामुळे 727 गावांना फायदा होणार आहे. प्रकल्पामुळे 1.25 लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, तसेच चारशे गावांना पाणीही मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदींनी या प्रकल्पाचे श्रेय प्रकल्पावर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांना दिले. 

श्‍यामाप्रसाद मुखर्जींना आदरांजली 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनसंघाचे संस्थापक श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहिली. "शिक्षण, आरोग्य, अर्थ आणि सुरक्षा ही क्षेत्रे सबल झाली पाहिजेत, असा श्‍यामप्रसाद यांचा दृष्टीकोन होता. युवकांना कौशल्य आणि संधी दिल्यास ते देशाला अधिक सक्षम करतील, असे ते म्हणत. स्टार्टअप, मेक इन इंडिया या योजना श्‍यामाप्रसाद मुखर्जींच्याच विचारांचा परिपाक आहे,' असे मोदी म्हणाले. आतापर्यंत केवळ एकाच कुटुंबाचा गुणगौरव केला गेला आणि इतर उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि कार्य असलेल्या महनीय लोकांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले, हे दुर्दैव आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: BJP lists nine steps taken by Narendra Modi govt towards welfare of differently abled