मोदींची कार्यपद्धती बदलली.. 2019 मध्ये पक्षाला किंमत चुकवावी लागेल! 

BJP is loosing its ground says Zafar Sareshwala
BJP is loosing its ground says Zafar Sareshwala

नवी दिल्ली : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काम करण्याची मला ठाऊक असलेली पद्धत आणि सध्याची भाजपची कामाची पद्धत यात जमीनअस्मानाचा फरक आहे. पक्षातील वाचाळ नेत्यांमुळेच भाजपला मोठा फटका बसणार आहे आणि या सगळ्यांची किंमत 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चुकवावी लागेल', असे सडेतोड मत झफर सरेशवाला यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमधील बडे व्यापारी असलेले सरेशवाला हे दीर्घकाळापासून मोदी यांचे निकटवर्तीय आहेत. 

एका लेखामध्ये सरेशवाला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीविषयीचे भाकीत केले आहे. 'मोदी यांच्या हातून आता गोष्टी निसटू लागल्या आहेत. भाजपच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. त्यातच कॉंग्रेसने सौम्य हिंदुत्व स्वीकारत भाजपच्या मतपेढीला धक्का दिला आहे', असे त्यांनी या लेखात म्हटले आहे.

मी गेली 13-14 वर्षे मोदींबरोबर आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदी यांनी धडाक्‍याने विकासकामे केली. त्यामध्ये मुस्लिम समाजाचाही विकास झाला. पण सध्या देशात असे चित्र निर्माण झाले आहे, की भाजप मुस्लिमांसाठी काहीच करत नाही'

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपच्या मित्रपक्षांनी किंवा समर्थकांनी बदलत्या राजकीय परिस्थितीविषयी भाष्य करण्यास सुरवात केली आहे. यापूर्वी बाबा रामदेव, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशमधील 'अपना दल' या मित्रपक्षाचे नेतेही भाजपच्या विरोधात बोलू लागले आहेत. 

'2019 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल, हे आताच सांगता येणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुढील पंतप्रधान कोण, याबद्दल काहीच बोलता येणार नाही', असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. 

'भाजपच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. त्यातच कॉंग्रेसने सौम्य हिंदुत्व स्वीकारत भाजपच्या मतपेढीला धक्का दिला आहे'

यापाठोपाठ सरेशवाला यांनीही भाजपच्या सध्याच्या स्थितीविषयी भाष्य केले आहे. 'पंतप्रधान मोदी यांची काम करण्याची पद्धत मला माहीत आहे. पण सध्याची भाजपची संघटना ज्या पद्धतीने काम करत आहे, ते पाहता मोदींच्या पद्धतीत बदल झाल्याचे मला जाणवत आहे. वाचाळ आणि बेताल नेत्यांमुळे पक्षाचे नुकसानच होत आहे आणि तरीही त्यांना आवर घातला जात नाही. गिरिराजसिंह, साक्षी महाराज आणि साध्वी प्रज्ञा जाती-धर्मांविषयी चुकीची विधाने करत असतात. हे नेते भाजपचे जहाज बुडवतील. देशातील मुसलमानांकडे भाजप दुर्लक्ष करत आहे आणि हेच त्यांना महागात पडेल', असे सरेशवाला यांनी लिहिले आहे. 

'गेल्या साडेचार वर्षांमध्ये मोदी सरकारने मुस्लिम समाजाच्या भल्याचे काही केले नाही. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला जो त्रास भोगावा लागला, तोच मुस्लिम समाजालाही भोगावा लागलाच. पण सरकारमधीलच काही घटकांच्या वर्तणुकीमुळे आणि बेताल वक्तव्यांमुळे समाजात असा संदेश जात आहे, की भाजप मुस्लिमांचा शत्रू आहे. मी गेली 13-14 वर्षे मोदींबरोबर आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदी यांनी धडाक्‍याने विकासकामे केली. त्यामध्ये मुस्लिम समाजाचाही विकास झाला. पण सध्या देशात असे चित्र निर्माण झाले आहे, की भाजप मुस्लिमांसाठी काहीच करत नाही', असेही सरेशवाला यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com