कैरानात भाजपला धक्का 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

गोरखपूर आणि फुलपूरनंतर उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही भाजपला जोरदार धक्का बसला. भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैरानामध्ये राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सुम हसन यांनी 55 हजार मतांनी विजय मिळवला. 

लखनौ : गोरखपूर आणि फुलपूरनंतर उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही भाजपला जोरदार धक्का बसला. भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैरानामध्ये राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सुम हसन यांनी 55 हजार मतांनी विजय मिळवला. 

2019मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कैरानाची पोटनिवडणूक महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी या भागात भाजप उमेदवाराचा जोरदार प्रचार केला होता. मात्र, गोरखपूर आणि फुलपूरनंतर भाजपला कैरानाचीही जागा गमवावी लागली. विरोधकांची एकजूट भविष्यात भाजपसाठी मोठा अडथळा ठरू शकते, असे मानले जात आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते हुकूमसिंह यांच्या निधनामुळे येथील जागा रिक्त झाली होती. भाजपने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात होत्या. हसन यांना कॉंग्रेस, समाजवादी पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्ष (बसप) या तिन्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा देत भाजपाला आव्हान दिले होते. 

कैरानाप्रमाणेच उत्तर प्रदेश विधानसभेच्या नूरपूरमध्येही भाजपला पराभव पत्करावा लागला. समाजवादी पक्षाच्या नईमुल हसन यांनी भाजपच्या अवनी सिंह यांचा 6,211 मतांनी पराभव केला. 

नागालॅंडमधील लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र भाजपच्या आघाडीमधील नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या तोखेयो येपथोमी यांनी नागा पीपल्स फ्रंटच्या सी. अपोक जमीर यांचा पराभव करत कॉंग्रेसची जागा हिसकावून घेतली.

Web Title: BJP loss kairana by election