भाजपने चाणक्य गमावला!

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 24 August 2019

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडकेपर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडकेपर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

मधुमेहापासून कॅन्सरपर्यंत अनेक आजारांशी झुंज देणारे जेटली यांनी गेली पाच वर्षे मोदी सरकारचे 1 संकटमोचक ही भूमिका निभावली होती. मात्र आजारपणामुळे त्यांच्या फिरण्यावर दिवसेंदिवस मर्यादा येत गेल्या यावर्षी लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही असे जाहीर केले. सुषमा स्वराज यांच्या आकस्मित निधनानंतर दोनच दिवसात त्यांना अतिशय गंभीर अवस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने बिघडतच गेली मागच्या आठवड्यात त्यांना व्हेंटिलेटर वरून लाइफ सपोर्ट सिस्टिम वर ठेवण्यात आले. अखेर आज दुपारी पाऊण वाजता निधन झाले असे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले.

त्यांच्या मागे पत्नी संगीता तसेच त्यांचा वकिलीचा वारसा चालविणारी रोहन व सोनाली ही मुले आहेत. संसदेतील "विद्युल्लता' असे वर्णन होणाऱ्या माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनाच्या धक्‍क्‍यातून सावरणाऱ्या सत्तारूढ भाजपला स्वराज यांच्याच वयाचे जेटली यांच्या जाण्याने अवघ्या  पंधरवडाभरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. 

Image result for arun jaitley family

नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी जन्मलेले जेटली यांनी दिल्ली विद्यापीठात अभाविप नेते म्हणून सार्वजनिक कारकीर्द सुरू केली. आणीबाणीत त्यांना 19 महिन्यांचा कारावास झाला. तिहार जेलमधील त्या दिवसांवर त्यांनी लिहीलेल्या आठवणींचे पुस्तकही चांगलेच गाजले. भाजपमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी 1991 पासून सक्रिय राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडलामध्ये ते कायदामंत्री होते. तर मोदी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मुख्यत्वे अर्थ व संरक्षण अशी अतिशय महत्वाची मंत्रिपदे समर्थपणे सांभाळली. 

arun jaitley

गेली किमान तीन वर्षे एकामागून एक आजारपणांशी झुंज देणारे जेटली यांना मागील आठवड्यात एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर काही तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी एम्स गाठले व जेटली यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्‍टरांशी चर्चा केली तेव्हाच जेटली यांची प्रकृतीबाबत शंकेची पाल चुकचुकली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही एम्समध्ये जाऊन जेटलींची विचारपूस केली.

जेटली यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर त्या दिवशी डॉक्‍टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबतचे निवेदन जारी करून त्यांची तब्येत "हेमो-डायनॅमिकली' स्थिर असल्याचे म्हणजे जेटलींचा रक्तदाब स्थिर असून त्यांची नाडी चालू असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर एम्सकडून याबाबत एकही निवेदन आलेले नव्हते. जेटली यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्या फुफ्फुसात पाणी शिरल्याने त्यांना श्‍वासोश्‍वास करण्यास त्रास होत होता व त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती. ही समस्या वारंवार उद्भवत होती. आज सकाळीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये भेट दिली व त्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाली. 

जेटली यांना पूर्वीपासूनच मधुमेहाचा विकार होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्थूलतेवर उपचार म्हणून बॅरिएट्रिक सर्जरी केली होती. मात्र त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीची गुंतागुंत वाढली. यंदा जानेवारीत त्यांना सॉफ्ट टिशू सरकोमा नावाचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊनही उपचार घेतले होते. 

सरकार-1 मध्ये अर्थमंत्री, संरक्षणमंत्री राहिलेले जेटली यांच्याकडे सुरवातीला चार मंत्रालयांचा पदभार देण्यात आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढू लागल्या तसतसे त्यांच्याकडील एकेक मंत्रालयाचा ताण मोदींनी हलका केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर जेटली यांनी स्वतःच मंत्रीपद सांभाळणे आता शक्‍य होणार नाही असे जाहीर केले होते. तरीही त्यांनी ब्लॉग लेखनाद्वारे मते मांडणे हिरीरीने सुरू ठेवले होते. अगदी मागच्याच आठवड्यात काश्‍मीरबाबतचे 370 वे कलम रद्द करण्याचा कायदा संसदेने मंजूर केला तेव्हा जेटली यांनी त्याबाबत जे भाष्य केले त्याचा आधार तर पंतप्रधानांनीही आपल्या अनेक संबोधनांत घेतला होता. 

Image result for arun jaitley

इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व असलेले जेटली हे जटील कायदेशीर मुद्यांवर तत्काळ व वस्तुनिष्ठ मतप्रदर्शन करण्यासाठी व शाब्दीक कोट्या करून संसदेत विरोधकांना नामोहरम करण्यासाठी प्रसिध्द होते. राज्यसभेत तर भाजपसाठी जेटली यांचे केवळ असणे म्हणजे फार मोठा आधार असे. 2009 ते 2014 या काळात विरोधी पक्षनेते व 2014 -19 या काळात राज्यसभेतील सभागृहनेते म्हणून जेटली यांनी अत्यंत प्रबावी कामगिरी बजावली. प्रसारमाध्यमांशी विशेषतः इंग्रजी माध्यमांशी त्यांचे विशेष सख्य होते. त्यांच्या अशोका रस्त्यावरील निवासस्थानी किंवा त्यांची प्रकृती ठीक असेपर्यंत संसदेतील त्यांच्या दालनातही विविध भाषिक पत्रकारांचा दरबार नियमित भरत असे. यावेळी सूचक "बातम्या' तर मिळतच पण हास्यविनोदाला बहर येई. जेटली यांच्या निधनाने तो दरबार आता पुन्हा भरणार नाही या जाणिवेने पत्रकारांमध्येही अस्वस्थता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp losses important person Arun jaitley from party