चार राज्यांत सत्ता स्थापन करणार : अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

'उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये तीन चतुर्थांश बहुमत मिळाले आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वांत मोठा विजय असावा, असे वाटते. हा विजय त्या त्या राज्यांतील जनतेचा विजय आहेच; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचाही विजय आहे.

नवी दिल्ली : 'हिंदू-मुसलमान या तिढ्यातून तुम्ही बाहेर या! मतदार हा मतदारच असतो; त्यात हिंदू-मुसलमान असा भेद नसतो. विकास सर्वांनाच हवा असतो,' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शनिवार) विरोधकांना कानपिचक्‍या दिल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह गोवा व मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावा अमित शहा यांनी केला.  

उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी आकडेवारी समोर येत आहे. मणिपूर आणि गोव्यामध्ये कॉंग्रेस-भाजपमध्ये चुरस आहे. या पत्रकार परिषदेत मात्र अमित शहा यांनी पंजाब वगळता इतर चारही राज्यांमध्ये पक्षाचा विजय झाला आहे, अशी भूमिका मांडली. पंजाबमधील पराभव त्यांनी मान्य केला. 'पंजाबमध्ये आम्ही पराभूत झालो असलो, तरीही मिळालेल्या मतांची टक्केवारी चांगली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये मिळालेला जनादेश ऐतिहासिक आहे. या विजयासाठी देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन!' असे शहा म्हणाले. 

'उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये तीन चतुर्थांश बहुमत मिळाले आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वांत मोठा विजय असावा, असे वाटते. हा विजय त्या त्या राज्यांतील जनतेचा विजय आहेच; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचाही विजय आहे. केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीवरच या निकालांनी पसंतीची मोहोर उमटविली आहे. 'पंतप्रधान मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत लोकप्रिय नेते आहेत' हे आता विरोधकांनीही मान्य करायला हवे. तीन वर्षांपूर्वी देशातील जनतेने मोदी आणि भाजपवर विश्‍वास दाखविला होता. हाच विश्‍वास अजूनही कायम आहे, हेच या निकालांमधून दिसले आहे,' असे शहा म्हणाले.

Web Title: BJP meet on Sunday to chose CMs for four states says Amit Shah