दंतेवाडा पुन्हा 'रक्तरंजित'; भाजप आमदार भीमा मांडवी ठार 

बुधवार, 10 एप्रिल 2019

भीमा मांडवी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते, ते धाडसी नेते होते. छत्तीसगडमधील लोकांची सेवा करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असत. त्यांचे अशाप्रकारे जाणे वेदनादायी आहे. मी त्यांचे समर्थक आणि कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.  - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राज्य पुन्हा एकदा भीषण नक्षलवादी हल्ल्यामुळे हादरले.

नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील श्‍यामगिरी हिल्स या भागामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये मांडवी हे घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले तर अन्य चार सुरक्षा रक्षकही हुतात्मा झाले. मांडवी यांचा ताफा बचेलीहून कुवाकोंडाच्या दिशेने चालला होता. पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. 

हल्लेखोर नक्षलवाद्यांनी सुरवातीला "आयईडी'चा स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर वाहनांच्या दिशेने बेछूट गोळीबारदेखील केला. या हल्ल्याचे वृत्त समजताच पोलिसांसह सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दंतेवाडा हा भाग बस्तर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांची धावाधाव सुरू होती. भीमा मांडवी यांच्या वाहनांचा ताफा कुवाकोंडाच्या दिशेने जात असताना नक्षलवाद्यांनी उच्च क्षमतेच्या "आयईडी'चा स्फोट घडवून आणला. या स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती, की काही क्षणांमध्ये वाहनांच्या ठिकऱ्या उडाल्या.

विशेष म्हणजे पोलिसांनी मांडवी यांना त्या मार्गाने जाऊ नका, असे बजावले होते; पण त्यांनी त्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि घात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. हुतात्म्यांना अभिवादन करतानाच त्यांचे बलिदान वाया जाणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेतला. 

भीमा मांडवी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते, ते धाडसी नेते होते. छत्तीसगडमधील लोकांची सेवा करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असत. त्यांचे अशाप्रकारे जाणे वेदनादायी आहे. मी त्यांचे समर्थक आणि कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

"त्या' हल्ल्याच्या आठवणी ताज्या 
याआधी 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बस्तरमधील बारापैकी केवळ दंतेवाडाची सीट भाजपने जिंकली होती. येथे भीमा मांडवी यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार देवती कर्मा यांना पराभूत केले होते. विशेष म्हणजे मांडवी यांच्याकडे भाजप विधिमंडळाचे उपनेतेपददेखील आहे. याआधी 25 मे 2013 रोजी झीरमघाटीमध्ये नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारचा भीषण हल्ला केला होता, त्यामध्ये कॉंग्रेसचे अनेक बडे नेते मारले गेले होते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विद्याचरण शुक्‍ल, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा आणि उदय मुदलीयार यांच्यासह तीस जणांचा समावेश होता. या हल्ल्यामुळे 2013 च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.