सरकारच्या प्रयत्नांनी बलात्कार थांबणार नाहीत, मुलींवर चांगले संस्कार करा; भाजप आमदाराची मुक्ताफळे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

उत्तर प्रदेश सरकार ज्यापद्धतीने या प्रकरणाला हाताळत आहेत, त्यावरही देशभरातून प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला जातोय.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवू सोडलं आहे. या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधकांनीही या प्रकरणी टीका केली आहे. या पीडितेच्या कुंटुबाला भेटण्यासाठी गेलेल्या राहुल आणि गांधींना उत्तर प्रदेश सरकारने मज्जाव केला होता. त्यांनतर काल पुन्हा एकदा पोलिसांशी झटापट करुन पीडितेच्या कुंटुंबियांना भेटून त्यांच्या न्यायासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा दिलासा या दोघांनीही दिला. मात्र, सरकार हे प्रकरण का दाबत आहे आणि उत्तर प्रदेश सरकार ज्यापद्धतीने या प्रकरणाला हाताळत आहेत, त्यावरही देशभरातून प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला जातोय. अशातच, भाजपच्या एका आमदाराने मुक्ताफळं उधळली आहेत.

मी फक्त एक आमदारच नाहीये तर एक शिक्षकही आहे. मी हे सांगतो की आपल्या मुलींवर चांगले संस्कार करायला हवेत. कारण, फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. चांगले संस्कारच बलात्कारांना आळा घालू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम असलं तरीही मुलींवर चांगले संस्कार घडवणं आणि त्यांना शालीनतेने राहण्यास शिकवणं हा आईवडिलांचा धर्म आहे, अशी मुक्ताफळे भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी उधळली आहे. हे बलिया मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत.

हेही वाचा - कोरोना लस कधी येणार आणि सर्वात आधी कोणाला मिळणार?

हाथरस प्रकरणावरून योगी सरकार आणि मोदी सरकार या दोन्ही सरकारांवर टिका होत आहे.  आमदार सुरेंद्र सिंह यांना याबाबत एका पत्रकाराने विचारलं की, असं म्हटलं जातंय की हे रामराज्य आहे मात्र रामराज्यातही अशाप्रकाच्या घटना घडतायत यावर आपली प्रतिक्रिया काय असं विचारलं असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हे प्रकरण असंवेदनशीलतेने दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप देशभरातून होतोय. अशातच, या प्रकारचे विधान समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्तता आहे. 

हेही वाचा - भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने हाथरस पीडितेचा VIDEO केला शेअर; महिला आयोगाने दिला इशारा

बलात्काराच्या घटनांमध्ये पुरुषी वृत्ती कारणीभूत असताना दरवेळी महिलांनाच दोषी ठरवण्याची ही मानसिकता बदलली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया या वक्तव्यावर येत आहे. अनेकांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mla surendra singh said rape happens due to non rite of girls