त्रिपुरातील भाजप सरकार संकटात, बंडखोर आमदार दिल्लीत दाखल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

मुख्यमंत्री देव यांचे निकटवर्तीय आणि त्रिपुरा भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारला कोणताच धोका नाही.

आगरथळा- त्रिपुरातील भाजप सरकार संकटात आले आहे. पक्षाच्या काही आमदारांनी मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. हुकुमशाह, अनुभवाची कमतरता आणि लोकप्रियतेचा अभाव यासारखे आरोप लावून आमदारांनी मुख्यमंत्री हटवण्याची मागणी केली आहे. सात आमदार दिल्लीत पोहोचले असून त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घ्यायची आहे. 

सुदीप रॉय वर्मन यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीत आलेल्या सात आमदारांनी त्यांच्याबरोबर आणखी किमान दोन आमदार असल्याचा दावा केला आहे. त्रिपुरा विधानसभेत एकूण 60 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात 36 आमदार हे भाजपचे आहेत. तर आयपीएफटीच्या 8 आमदारांचेही भाजपला समर्थन आहे. 

हेही वाचा- Video: बलात्काऱ्याला तिकीट देऊ नका म्हणणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारहाण

वर्मन यांच्याशिवाय दिल्लीत सुशांता चौधरी, आशिष शहा, आशिष दास, दिवाचंद्र रनखल, बर्ब मोहन त्रिपुरा, परिमल देव वर्मा आणि रामप्रसाद पल हे आमदार आले आहेत. विरेंद्र किशोर देव वर्मन आणि विप्लव घोष हे आमदारही आपल्याबरोबर असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. या दोघांना कोरोना झाल्यामुळे ते दिल्लीला येऊ शकलेले नाहीत. 

हेही वाचा- Bihar Election : काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर ;बंडानंतर पहिल्यांदाच पायलटांवर मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री देव यांचे निकटवर्तीय आणि त्रिपुरा भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारला कोणताच धोका नाही. सरकार पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक शहा यांनी केला आहे. केवळ सात ते आठ आमदारांच्या जोरावर सरकार पडू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच या आमदारांनी पक्षातील वरिष्ठांकडे कोणतीच तक्रार केली नव्हती, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mla of tripura in delhi against cm biplab kumar deb