भाजप खासदारांचा "क्‍लास' सुरू 

bjp MP s workshop starts in delhi
bjp MP s workshop starts in delhi

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा-राज्यसभा खासदारांसाठी असलेल्या "अभ्यास वर्गा'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी झाले. संसदीय ग्रंथालयाच्या बालयोगी सभागृहात होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात पंतप्रधान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी वरिष्ठ नेते व संसदीय प्रणालीचे जाणकार भाजप खासदारांना संसदेत वावरताना आवश्‍यक त्या उक्ती व कृतीबाबतचे धडे देतील. ठाण्याच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या मदतीने भाजपचा हा खासदार अभ्यास वर्ग घेतला जात आहे. 

दोन दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राची सुरवात नड्डा यांच्या भाषणाने झाली. त्तपूर्वी राष्ट्रगीत व संपूर्ण वंदे मातरम झाले. अमित शहा आज संध्याकाळी खासदारांना उपदेश करतील. मोदी उद्या (ता. 4) संध्याकाळी समारोपाचे भाषण करतील. फोटो सेशन वगळता या कार्यक्रमकडे फिरकण्यासही पत्रकारांना पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. 
पंतप्रधान मोदी व शहा प्रत्येक साप्ताहिक भाजप संसदीय बैठकीत पक्षाच्या खासदारांना संसदेतील उपस्थिती, शिस्तपालन, जास्तीत जास्त विषयांची मांडणी, सक्रियतेच्या वर्तुळाबाहेर गेलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा बहुतांश राबता असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये टाईमपास करण्यापेक्षा संसदेच्या समृध्द ग्रंथालयात बसून वेळ सत्कारणी लावावा, याबाबतच्या कानपिचक्‍या देत असतात. मात्र तरीही पक्षनेतृत्वाला त्यांच्यासाठी हा वेगळा अभ्यासवर्ग घेण्याची आवश्‍यकता भासावी हे लक्षणीय मानले जाते. 

एरव्ही दर शुक्रवारी संध्याकाळी खासदार आपापल्या मतदारसंघांत परततात. मात्र या आठवड्यात या दोन दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित राहणे खासदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आज सकाळी प्रथम संसदेत येणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (हामीरपूर), भोजपुरी अभिनेते रविकिशन (गोरखपूर) व मनोज तिवारी (दिल्ली), क्रिकेटपटू गौतम गंभीर (दिल्ली), साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (भोपाळ), तेजस्वी सूर्या (बंगळुरू) आदींचा समावेश होता. 

भाजपने 2014 मध्येही तेव्हाच्या 180 नवख्या खासदारांसाठी सूरजकुंड येथे असाच वर्ग घेतला होता. सर्वश्री लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरूण जेटली यांनी भआजप खासदारांना कानमंत्र दिला होता. त्यावेळी मात्र ही सर्व नावे अंतर्धान पावली आहेत. सतराव्या लोकसभेच्या खासदारांना मार्गदर्शन करणाऱ्यांपैकी मोदी, शहा, नितीन गडकरी, नड्डा व राजनाथसिंह वगळता जुन्या फळीतील अन्य कोणीही नाही. 

सलग दुसऱ्यांदा दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या भाजपतर्फे यावेळेस निवडून आलेल्या 303 पैकी तव्वब सव्वाशे खासदार नवखे आहेत. यातील अनेकजण निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले असल्याने त्यांना भाजप व परिवाराची विचारसरणी योग्य पध्दतीने समजावून सांगण्यासाठी या अभ्यासवर्गाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आगामी काळात होणाऱ्या पदयात्रेचे विशेष प्रात्यक्षिकही यानिमित्ताने खासदारंसमोर सादर होणार असल्याची माहिती मिळते. आपापल्या मतदारसंघांतील गावपातळीवर थेट संपर्क वाढविणे व जनतेची कामे करण्याबाबत दिल्लीतील मंत्र्यांशी सातत्याने संवाद ठेवणे याबाबतही खासदारांना काही खास सूचना करण्यात येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com