भाजप खासदार, आमदारांना द्यावा लागणार हिशोब

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मोदींच्या या निर्णयाने देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या खात्यावरील हिशोब द्यावा लागणार आहे. आज (मंगळवार) मोदींनी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांनादेखील हा हिशेब मागितला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता भाजपच्या खासदार व आमदारांना 8 नोव्हेंबरनंतर खात्यावरून करण्यात आलेल्या सर्व व्यवहारांचा हिशोब देण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काळा पैशाचा नायनाट करण्याच्या उद्दिष्टाने हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे देशभरात बँका व एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा पहायला मिळत आहेत. तसेच विरोधकांकडूनही या निर्णयाची चुकीची अंमलबजावणी झाल्याचा आरोप करण्यात येत होता. तर, दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून निर्णयाचे स्वागत करण्यात येत होते. तसेच कॅशलेस व्यवहारांचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येत होते.

मोदींच्या या निर्णयाने देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या खात्यावरील हिशोब द्यावा लागणार आहे. आज (मंगळवार) मोदींनी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांनादेखील हा हिशेब मागितला आहे. मोदींनी पक्षाच्या देशभरातील सर्व खासदार आणि आमदारांच्या बँक खात्यावर 8 ते 31 डिसेंबरदरम्यान पार पडणाऱ्या व्यवहारांचा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: BJP MPs, MLAs to submit details of their bank account transactions between November 8 and December 31 to BJP President Amit Shah